Belagavi

एकनाथ शिंदे यांच्या निर्धाराने कन्नड संघटनांना पोटशूळ

Share

येत्या 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावात काळा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी काळा दिन कार्यक्रमास उपस्थित राहतील असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यावर कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. त्यांच्या दबावाखाली येऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काळा दिनाला बंदी तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद सुरू झाला आहे. राज्योत्सवासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज पूर्वतयारीची बैठक घेतली.

या बैठकीत कन्नड संघटनांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला काळा दिन पाळण्यास तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली. त्यानुसार म. ए. समितीला काळा दिन पाळण्यास बंदी करण्याचे आदेश दिले जातील, याशिवाय महाराष्ट्रातील नेत्यांना त्यादिवशी जिल्हाबंदी करण्यात येईल असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. फ्लो
दरम्यान, महाराष्ट्रातील कोल्हापुरात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिन कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी सहभागी होतील असे सांगून मराठी सीमावासीयांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा असून, 1 नोव्हेंबर रोजी म. ए. समितीच्या बेळगाव येथे होणाऱ्या काळ्या दिनाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचा प्रतिनिधी पाठवू असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

दरम्यान, राज्योत्सवापूर्वीच्या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधित करण्याचा इशारा दिला आहे. सीमावर्ती जिल्हा बेळगावमध्ये एमईएस काळा दिन साजरा करण्यासाठी आमच्या जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गेल्या वर्षीही आम्ही काळा दिन साजरा करण्याची परवानगी दिली नव्हती. त्याबाबतचा अर्ज आम्ही सरकारकडे पाठवला आहे. आमचे पोलीस सीमेवर कडक बंदोबस्त ठेवतील. पोलिसांच्या सर्व तयारीनिशी आम्ही राज्योत्सव मोठ्या थाटात साजरा करू. आमच्या जिल्ह्यात येणार महाराष्ट्रातील नेता कितीही मोठा असला तरी निर्बंध जिल्ह्यावर लादण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले

एकंदरीत बेळगावच्या जिल्हाधिकार्‍यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला काळा दिन साजरा करण्याची परवानगी देणार नसल्याचे सांगितल्याने जिल्ह्यातील कन्नडिगांना आनंद झाला आहे, तर काळ्या दिन कार्यक्रमाला महाराष्ट्राचा प्रतिनिधी पाठवणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे लवकरच समजून येईल.

Tags:

#mes #blackday #eknathashinde #krv