Belagavi

खबरदार, समाजमाध्यमांवर प्रक्षोभक पोस्ट कराल तर… पोलिस आयुक्तांचा कडक इशारा

Share

बेळगावात समाजमाध्यमांवर प्रक्षोभक मजकूर पोस्ट करणे आता सामान्य झाले आहे. मात्र त्याचे दुष्परिणाम होत असून यापुढे अशा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करणे महागात पडणार आहे. अशा पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी दिलाय.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा म्हणाले की, सोशल मीडियावर प्रक्षोभक मजकूर पोस्ट करण्याचे प्रकार वाढू लागले असून त्याची गंभीर दखल पोलीस खात्याने घेतली आहे. बेळगावातील खडेबाजार आणि शहापूर येथील प्रक्षोभक पोस्ट प्रकरणी कठोर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर आणखी चिथावणीखोर गोष्टी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितले.

शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारी कृत्ये आणि धर्म, जात, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अपमानास्पद पोस्ट करणे हा गंभीर गुन्हा आहे. आमच्या विभागाच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग युनिटला द्वेष आणि प्रक्षोभक पोस्टवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

भडकाऊ पोस्ट फॉरवर्ड करणे, लाईक करणे किंवा कमेंट करणे हा देखील गुन्हा मानला जाईल आणि दोषी व्यक्ती किंवा गटांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवांना थारा देऊ नका, पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईलवर लक्ष ठेवून मुलांना नियंत्रणात ठेवावे असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

Tags:

# Police# security#Belagavi #Karnataka #India