Belagavi

चव्हाट गल्ली मारुती मंदिरात रंगला पारंपरिक हादगा

Share

‘हस्त हा नक्षत्राचा राजा’, ‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबू झेलू’ अशी पारंपरिक गाणी गात फेर धरणाऱ्या महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह, बालपणीच्या आठवणींना उजाळा देत रंगलेले हास्यविनोद अशा उल्हासपूर्ण वातावरणात चव्हाट गल्ली जालगार मारुती मंदिरात पारंपरिक हादगा कार्यक्रम पार पडला.

होय, आधुनिक जीवनशैली अवलंबताना काही जुन्या पण चांगल्या रूढी, परंपरा लोप पावत चालल्या आहेत. नव्या पिढीला त्यांची ओळख करून देऊन, त्याचे महत्व पटवून देण्याच्या हेतूने बेळगावातील चव्हाट गल्लीतील महिलांनी नवरात्रानिमित्त हादग्याचा उपक्रम राबविला. गल्लीतील जालगार मारुती मंदिरात सगळ्याजणींनी मिळून हादगा खेळला. घरून डब्यातून खिरापतही आणली आणि एकमेकींना वाटली.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना तेजस्विनी स्वप्नील पाटील यांनी सांगितले की, एकविसाव्या शतकात काही जुन्या रूढी, परंपरा लोप पावत चालल्या आहेत. लोकसंस्कृतीच्या खुणा असलेल्या या रूढी-परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यातून हादगा हा महिलांना रोजच्या धावपळीच्या दिनचर्येतून काही काळ विरंगुळा मिळवून देणारा पारंपरिक उपक्रम. म्हणून आम्ही नवरात्रानिमित्त हादग्याचे आयोजन केले.

घरून डब्यातून खिरापत आणली. हादग्याची पारंपरिक गाणी गात फेर धरला. या उपक्रमातून आम्ही खूप मजा केली, खूप छान वाटले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
एकंदर, आधुनिक काळातही हादग्यासारखा पारंपरिक उपक्रम राबवून त्याची जपणूक करण्याचे काम चव्हाट गल्लीतील महिलांनी केले हे प्रशंसनीयच म्हणावे लागेल.

Tags: