Belagavi

राणी चन्नम्माच्या मूळ गावी काकती येथे भव्य कित्तूर उत्सव

Share

इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या देशातील पहिल्या स्वातंत्र्ययोद्धया क्रांतिवीर राणी कित्तूर राणी चन्नम्मा यांचे जन्मगाव असलेल्या काकती येथे कित्तूर राणी चन्नम्मा विजयोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते कित्तूर उत्सव 2023 चे उद्घाटन करण्यात आले.

काकती येथील शासकीय कन्नड शाळेसमोर कित्तूर उत्सव 2023 चा उदघाटन समारंभ पार पडला. शालेय मुलांनी कित्तूर राणी चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेतले. तर परंपरेनुसार डोक्यावर जलकुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या. या उत्सवात पूज्य श्री राचय्या महास्वामी सहभागी झाले होते. त्यांनी संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्तीला हार घालून विशेष पूजा केली.

उदघाटन समारंभात बोलताना पूज्य श्री राचय्या महास्वामी यांनी चन्नम्मा यांचे माहेर असलेले काकती गाव तसेच कित्तूर आणि तेथील किल्ल्याचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पालक मंत्र्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून, कित्तूर किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक स्थळ बनवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, जिल्हा पंचायत, जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत, कन्नड व संस्कृती विभागाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे वीरराणी कित्तूर राणी चन्नम्मा उत्सव कित्तूर येथून सुरू होत आहे. काकती हे राणी चन्नम्माजी यांचे मूळ गाव, त्या गावाचा विकास करणे हा आमच्या कित्तूर महोत्सवाचा उद्देश आहे.


यावेळी बेळगावच्या आरपीडी कॉलेजच्या कन्नड विभागाचे प्रमुख डॉ. एच.बी. कोलकार यांनी, कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या विजयावर व्याख्यान दिले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, काकती ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, उपसरपंच श्रावण नायक, शिवानंद तल्लुर, कित्तूर राणी चन्नम्माजी महोत्सव समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Tags: