Belagavi

अनगोळ-टिळकवाडी परिसरात तिसऱ्या दिवशीची दुर्गामाता दौड

Share

सळसळत्या उत्साहाने भरलेले पांढऱ्या शुभ्र कपड्यातील धारकरी, त्यांच्या डोकीवर भगवे फेटे आणि टोप्या, हाती भगवे ध्वज आणि तलवारी अशा जल्लोषपूर्ण वातावरणात बेळगावात हजारोंच्या संख्येने लहान मुले, नवयुवक आणि युवक-युवतींच्या सहभागाने आज तिसऱ्या दिवशीची दुर्गामाता दौड अनगोळ-टिळकवाडी परिसरात काढण्यात आली.

श्री शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथे आज तिसऱ्या दिवशीच्या दुर्गामाता दौडला ध्वजपूजन करून ध्येयमंत्र म्हणून प्रारंभ करण्यात आला. तेथून एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, फर्स्ट गेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस स्विमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड-हरिमंदिर, चिदंबर नगर, पानसे हॉटेल रोड, हद्दुगेरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हनमन्नावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली आदी मार्गांवर फिरून दौडची महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे सांगता झाली.

गेल्या दोन दिवसांप्रमाणेच आज तिसऱ्या दिवशीच्या दौडला भव्य प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळून ध्वजपूजन करून दौडीचे स्वागत केले. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून दौडचे स्वागत करण्यात आले. दौडच्या मार्गावर महिलांनी सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या व धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्याचप्रमाणे लहानग्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसन्ग साकारणारे देखावे सादर केले होते.

दौडसंदर्भात इन न्यूजशी बोलताना सहभागी धारकरयांनी आपले अनुभव व्यक्त केले. मदन मुचंडी यांनी सांगितले की, बेळगावात दुर्गामाता दौड सुरु होऊन यंदा 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. दौडमध्ये सहभागी होत आहोत. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारी नवी पिढी, नवयुवक घडावेत यासाठी या दौडचे आयोजन केले जाते. अन्न, वस्त्र व निवाऱ्याइतकीच शिवसूर्य प्रकाशाची आपल्याला गरज आहे. तो या उपक्रमातून मिळतो. महिलांनीही दौडमध्ये सहभागी होऊन नवरात्रात महिषासुर मर्दिनीचा जागर करावा असे आवाहन त्यांनी केले

दत्तात्रय पाटील यांनी नवयुवकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे कार्य दुर्गामाता दौडमधून होते. हिंदू धर्माचा, हिंदू देवदेवतांचा जागर करण्यासाठी आणि एकूणच जीवनाची योग्य दिशा मिळण्यासाठी दुर्गामाता दौडचा उपक्रम सहाय्य्यकारी ठरतो. त्याला बेळगाव शहर आणि अन्यत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले

एकंदर तिसऱ्या दिवशीच्या दुर्गामाता दौडला बेळगावात प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहर-परिसरातील शेकडो युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे लहान मुलांनीही न थकता शेवटपर्यंत अत्यंत उत्साहाने दुर्गामाता दौडमध्ये भाग घेतला.

Tags: