Belagavi

नूतन एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी घेतला 19 वा फोन-इन कार्यक्रम

Share

बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी माजी एसपी डॉ. संजीव पाटील यांनी सुरु केलेल्या फोन-इन कार्यक्रमाची परंपरा विद्यमान एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनीही पुढे सुरु ठेवली आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात आज त्यांनी फोन-इन कार्यक्रम घेऊन शहर आणि जिल्ह्यातील लोकांच्या तक्रारींना प्रतिसाद दिला.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या नेतृत्वाखालील 19 व्या फोन-इन कार्यक्रमात शहर-जिल्ह्यातील अनेक लोकांनी फोन करून आपल्या तक्रारी मांडल्या. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये होणारी अवैध दारू विक्री, कौटुंबिक समस्या, वाहतूक समस्या आणि आर्थिक व्यवहाराबाबत लोकांनी तक्रारी केल्या.

अथणी येथील एका व्यक्तीने फोन करून तालुक्यातील बनावट पत्रकारांचा त्रास रोखण्याची विनंती केली. तसेच बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याने जनतेला खूप त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली. यावर एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

रायबाग तालुक्यातील एका व्यक्तीने फोन केला, येथील एक पोलीस शेतात काम करू देत नाही. तो आपल्यावर अत्याचार करत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार त्यांनी केली. सर्वांचे फोन घेऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणारे एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी त्यावर उपाय करण्याचे आश्वासन दिले.

अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, निरीक्षक महादेव एस.एम., बी. आर. गड्डेकर, पोलीस कर्मचारी श्रीशैल, रमेश आदी उपस्थित होते.

Tags: