बेळगावातील कित्तूर चेन्नम्मा सर्कलमधील कन्नड साहित्य भवनाच्या प्रांगणात 15 ऑक्टोबरपासून 96 व्या नाडहब्बा भुवनेश्वरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. एच. बी. राजशेखर यांनी दिली.
बेळगावात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. राजशेखर म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव म्हणजे केवळ दिखाऊ उत्सव नाही. आपली भूमी गतवैभव आणि कला संस्कृतीने भरलेली आहे. आजच्या तरुणांना याची जाणीव करून देण्यातही याचे आयोजन केले आहे. विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे.
कन्नड साहित्यिक सी. के. जोरापूर म्हणाले, या उत्सवाबद्दल बोलायचे झाले तर नाडहब्बाची सुरुवात विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हक्का बुक्का यांनी केली होती. त्यानंतर म्हैसूरमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. 1927 मध्ये बेळगावात शिवलिंग रुद्रदेसाई यांच्या हस्ते नाडहब्बाची सुरुवात झाली. त्या प्रसंगी त्यांनी संपूर्ण खर्च उचलला आणि या उत्सवासाठी अनेकांनी हातभार लावल्याचे सांगितले
पत्रकार परिषदेत ऍड. आर. बी. पाटील, डॉ. एच. आय. तीम्मापुर, विजय हिरेमठ, सोमलिंग माविनकट्टी, प्रिया पुराणिक उपस्थित होते


Recent Comments