बालरक्षण अभियानांतर्गत बेळगावात आज भव्य फेरी काढून बालमजुरी प्रथेविरोधात आणि बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली.

राज्य बालहक्क संचालनालय, बेंगळूर, बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा बालहक्क रक्षणाधिकारी कार्यालय आणि विविध खात्यांच्या सहयोगाने बेळगाव जिल्ह्यात 2 ते 12 ऑक्टोबर दरम्यान बालरक्षण अभियान राबविण्यात आले. त्याची सांगता आज भव्य फेरी काढून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज सकाळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याहस्ते झेंडा दाखवून या फेरीला चालना देण्यात आली.

यावेळी इन न्यूजशी बोलताना जिल्हा बालहक्क रक्षणाधिकारी महांतेश बजंत्री यांनी सांगितले की, राज्य बालहक्क संचालनालय, बेंगळूर यांच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यात 2 ते 12 ऑक्टोबर दरम्यान बालरक्षण अभियान राबविण्यात आले. त्याची सांगता आज भव्य फेरी काढून करण्यात येत आहे. या अभियानासाठी बेळगाव महानगरपालिका, कामगार, आरोग्य आणि पोलीस आदी खात्यांचे सहकार्य लाभले आहे. बेळगाव शहरातील बालमजुरीचे हॉटस्पॉट निश्चित करून त्याठिकाणी पाहणी करून बालमजुरांची शोध घेण्यात आला आहे. बालमजुरांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करून शिक्षण देणे, त्यांना सक्षम बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या अभियानाचा हेतू आहे. बेळगावात आज विविध खात्यांच्या सहभागाने बालहक्कांविषयी जागृती करण्यासाठी भव्य फेरीचे आयोजन केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु झालेली फेरी गांधीनगर, नवे भाजीमार्केट, सीबीटी मध्यवर्ती बसस्थानक, फोर्ट रोड, शनिमंदिर परिसर, खडेबाजार, गणपत गल्ली, शनिवार खूट, काकतीवेस, कोल्हापूर सर्कल, रामदेव हॉटेल परिसर, सदाशिवनगर, केएलई परिसर आदी भागात फिरल्यानंतर सांगता करण्यात आली. फेरीत विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments