धर्मादाय खात्याच्या धार्मिक परिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून बैलहोंगल शहरातील डॉ. महांतेश शास्त्री आराद्रीमठ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी बेळगावातील लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठाच्या शाखेत श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी बोलताना डॉ. महांतेश शास्त्री म्हणाले की, धर्मादाय खात्याची धार्मिक परिषद गेली अनेक वर्षे अप्रतिम कार्य करत आहे. राज्यात खात्याच्या अखत्यारीत 4,220 हून अधिक देवस्थान आहेत. यांची जबाबदारी धर्मादाय विभागावर असून, त्या अंतर्गत एक धार्मिक परिषद आहे. तिचे अध्यक्ष धर्मादाय मंत्री आहेत. या समितीवर 8 नामनिर्देशित सदस्यांची निवड सरकारने केली आहे असे ते म्हणाले.
उत्तर कर्नाटकातून माझी नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, धर्मादाय मंत्री रामलिंगा रेड्डी, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलागी यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू. हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींमुळेच माझी इतकी प्रगती झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी विधायक कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की, सरकारने तुम्हाला जबाबदारीचे पद दिले आहे. धर्मादाय विभागाशी संबंधित काम नीटपणे करावे आणि उत्तर कर्नाटकातील मंदिरांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा असा कानमंत्र दिला.
भारतीय अभियंता संघाचे सचिव एम. व्ही.हिरेमठ, सोमशेखर हिरेमठ, चंद्रशेखरय्या सालीमठ, मुक्तार हुसेन पठाण आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments