Belagavi

घरासमोर उभ्या केलेल्या इको कारची चोरी

Share

ऐन गणेशोत्सवाच्या काळात बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या, वाहने चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. सदाशिवनगर परिसरात घरासमोर उभी करण्यात आलेली इको कार चोरण्यात आली आहे. बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

यासंबंधी हॉटेल व्यावसायिक प्रसाद बाळू पाटील यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री प्रसाद यांनी केए’ २२, झेड २३७४ क्रमांकाची कार आपल्या घरासमोर
उभी केली होती. ते मार्केट यार्ड परिसरात हॉटेल चालवतात. बुधवारी सकाळी हॉटेलला जाण्यासाठी तयार झाले. त्यावेळी घरासमोर उभी करण्यात आलेली कार चोरीस गेल्याचे उघडकीस आले.

चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एपीएमसी पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. फुटेजमध्ये कारचोर वाहनांचा दरवाजा उघडून ती घेऊन गेल्याचे दिसत आहे. पोलिसांनी सदाशिवनगर पहिला मेन, चौथा क्रॉस येथे भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी पुढील तपास करीत आहेत.

Tags: