Belagavi

स्वयंसेवी संस्थांनी समाजात पशुदयेची भावना निर्माण करावी : आ. राजू सेठ

Share

समाजात पशुदयेची भावना निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी जागृती निर्माण करावी असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी केले.

बेळगावातील हॉटेल सन्मान समोरील पशुवैद्यकीय रुग्णालयात आज शनिवारी “जागतिक रेबीज दिन” साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पशुसंगोपन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर होते. कार्यक्रमाचे उदघाटन केल्यावर बोलताना आ. सेठ पुढे म्हणाले की, प्राण्यांनाही जीव असतो, त्यांना लळा लावल्यास तेदेखील माणसाचे रक्षण करतात हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे.

पशूंबाबत विशेषतः पाळीव प्राण्यांबाबत समाजात जागृती होत आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र अजूनही व्यापक जागृती करण्याची गरज आहे. या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांनी आणखी जागृती निर्माण करावी असे आवाहन आमदार राजू सेठ यांनी केले.

सीमा नरगुंद यांनी स्वागत केल्यावर पशुसंगोपन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे मुख्य पशुवैद्याधिकारी डॉ. आनंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आ. राजू सेठ व अन्य मान्यवरांच्या हस्ते जागतिक रेबीज विरोधी दिन आणि मोफत पशु लसीकरण मासाचे दीप प्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी पाळीव प्राण्यांना मोफत रेबीज लसीकरण करण्यात आले. पेट शॉप मालकांना तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्राणी कल्याण कार्यात गुंतलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रशंसा प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पशु कल्याण संस्था आणि निःस्वार्थ पशु सेवांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना मोफत प्रथमोपचार वैद्यकीय किटचे वितरण करण्यात आले. त्यानंतर रेबीज जनजागृती कार्यक्रम पार पडला.

मुख्य पशुवैद्याधिकारी डॉ. मोहम्मद रहमत मुल्ला यांनी आभार मानले. यावेळी पशुसंगोपन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: