Belagavi

बेळगावात बंदचा फज्जा :शहरात सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू

Share

कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात आज काही संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर करवे शिवराम गौडा गटाने बेळगावात अगदी सकाळी सकाळीच आंदोलन केले. बेळगाव येथील मध्यवर्ती बसस्थानकावर करवे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकुडी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात तामिळनाडूला पाणी सोडल्याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

“आमची आहे आमची, कावेरी आमची आहे” अशा घोषणा देणाऱ्या करवे कार्यकर्त्यांच्या निषेधाला शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दिला. आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक करण्यासाठी धाव घेतली. यावेळी जोरदार विरोध दर्शवत आंदोलक रस्त्यावर उतरले. नंतर त्याना अटक करून पोलिसांच्या वाहनातून नेण्यात आले.

जिल्ह्यात बंदचा म्हणावा तसा परिणाम जाणवला नाही. केएसआरटीसी बस आणि खाजगी वाहने नेहमीप्रमाणे सुरू असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली नाही. हॉटेल आणि दुकाने सुरु आहेत . सकाळच्या आंदोलनामुळे बससेवा बंद पडल्याने प्रवाशांना काही काळ ताटकळत राहवले लागले . आंदोलकांना अटक केल्यानंतर बस वाहतूक सुरळीत सुरू झाली. तसेच दुकाने पूर्णतः उघडी असून लोकांची वर्दळ नेहमीप्रमाणेच आहे.

Tags: