Belagavi

जिल्हास्तरीय ‘जनता दर्शन’ला अभूतपूर्व प्रतिसाद

Share

जनतेला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बेंगळुरला जावे लागू नये यासाठी स्थानिक पातळीवर जनता दर्शन आयोजित केले जात आहे. याचा लाभ जनतेने घ्यावा, असे प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.

बेळगाव शहरातील केपीटीसीएल कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या जनता दर्शनसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या जनतेने व्यासपीठावर येऊन तक्रारी मांडल्या. याशिवाय सभागृहात उभारलेल्या आठ काउंटरवर काही नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या.

जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा प्रशासन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. मात्र, जनतेची भटकंती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसार जनता दर्शन कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी, जनतेने जनता दर्शनात सहभागी होऊन त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवून घ्याव्यात, कारण येथे जिल्हाधिकार्‍यांसह सर्व अधिकारी उपलब्ध असतील आणि लोकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, अशी सूचना केली. .

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला आणि तालुकास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दर पंधरवड्याला जनता दर्शन घेण्यात येणार आहे. लोकांच्या तक्रारी घेण्यासाठी आठ काउंटर सुरू करण्यात आले आहेत. येथे प्राप्त झालेल्या अर्जांची नोंदणी आयपीजीआरएस पोर्टलवर केली जाईल. जिल्हा स्तरावर निकाली काढता येणारे अर्ज त्वरित निकाली काढण्यात येतील. राज्य शासनाच्या स्तरावर ज्या अर्जांचे निराकरण करता येईल, ते पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेगनायक, डीसीपी रोहन जगदीश, चिकोडीचे प्रांताधिकारी माधव गित्ते, आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी शुभम शुक्ला आदी उपस्थित होते.

Tags: