Belagavi

बाप्पांच्या स्वागताच्या खरेदीसाठी बेळगावातील बाजारपेठा झाल्या फुल्ल !

Share

सर्वांच्या लाडक्या बाप्पांचं आगमन आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलय. त्यामुळे बेळगावातील बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत, गणरायाच्या स्वागतात कसलीही कसर राहणार नाही याची दक्षता घेत गणेशभक्त चोखंदळपणे सजावटीचे आणि पूजेचे साहित्य खरेदी करताना दिसून आले.

होय, लाडक्या विघ्नहर्त्या गणपतीबाप्पांचे आगमनाला आता केवळ एक दिवस उरलाय. उद्या सकाळपासून सगळ्यांच्या घरी गणराज विराजमान होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तमाम गणेशभक्तांनी आज बेळगावातील सगळ्याच बाजारपेठा गजबजून गेल्या. गणरायाच्या डेकोरेशनचे सर्व साहित्य मिळणारी पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली बाजारपेठ, पूजेचे, नैवेद्याचे साहित्य आणि फुले-फळे मिळणाऱ्या गणपत गल्ली, रविवारपेठ, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली आदी बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. यंदा जणू गर्दीचे सगळेच विक्रम मोडीत निघाल्याने व्यापाऱ्यांचे चेहरेदेखील फुलले होते.

केवळ बेळगाव शहरच नव्हे तर खानापूर, निपाणी, संकेश्वर, हुक्केरी, हुबळी-धारवाड, बैलहोंगल, महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच शेजारच्या गोवा राज्यातूनही खरेदीसाठी बेळगावच्या बाजारपेठांत गर्दी केली. पांगुळ गल्लीत तर पाऊल ठेवायला देखील जागा नव्हती असे चित्र दिसून आले. या ठिकाणी गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागणारे विविध डिझाइन्स, रंगसंगतीचे, शेकडो प्रकारचे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे. चोखंदळपणे, प्रसंगी बजेटचा विचार न करता आवश्यक साहित्य खरेदी करताना आबालवृद्धांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

गणरायाच्या स्वागतात कसलीच त्रुटी राहू न देण्याचा पणच गणेशभक्तांनी केल्याचे त्यांनी इन न्यूजशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियांवरून दिसून आले. यासंदर्भात बसवराज गानगेर यांनी, काही वर्षे कोरोनामुळे मनाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हतं, पण यंदा त्याचे सावटही नसल्याने भक्तांचा उत्साह ओसंडून वहात असल्याचे सांगितले. पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली अशा सगळ्याच ठिकाणी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे. सर्वचजण गणरायाच्या स्वागतासाठी मनसोक्त खरेदी करत आहेत असे त्यांनी सांगितले.

अनगोळ येथील दर्शना बडमंजी यांनी सांगितले की, वर्षातून एकदा येणाऱ्या गणरायाच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो. बाप्पांचे आगमन एका दिवसावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे सजावटीचे व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी पांगुळ गल्लीत आलो आहोत. येथे सर्व प्रकारचे साहित्य भेटते, त्यामुळे येथे आलो आहोत असे सांगून सर्वाना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. बाईट.
आणखी एका ग्राहक महिलेने सांगितले की, आम्ही घरी नेहमी पर्यावरणपूरक शेडू मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करतो. येथे डेकोरेशनचे साहित्य आणि मुलांना कुर्ता व ड्रेस खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. .

ग्राहकांच्या अमाप प्रतिसादामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांचे चेहरेही चांगलेच फुलल्याचे दिसून आले. व्यापारी विकी मेहता यांनी सांगितले की, यावर्षी आम्ही विचारही केला नाही इतका ग्राहकांचा अमाप प्रतिसाद लाभतो आहे. लोक थर्मोकोलचे तयार साहित्य घेण्यापेक्षा स्वतःचा सेटअप उभारून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यावर भर देत आहेत. तासनतास चोखंदळपणे निरीक्षण करून साहित्य खरेदी करत आहेत.

आमच्याकडे जरदोसी तोरण, कुंदन, विविध रंगांचे लेस, लेसवाले पडदे, 0.2 वॅट पासून ते 240 वॅटपर्यंतचे लाईट्स, बेळगावचे वैशिष्ट्य असलेल्या वाद्या, लाईटच्या माळा, झुंबर, कृत्रिम फुले-वेली, असे सजावटीचे असंख्य नमुन्याचे साहित्य उपलब्ध आहे. ग्राहकांचा यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. सर्वानी फटाके फोडताना दक्षता घेऊन गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करून मेहता यांनी सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या..

आणखी एक व्यापारी देवाराम यांनी सांगितले की, सजावटीच्या वस्तू, माळा, लेस, कुंदन वर्कसाठीचे साहित्य, गणपतीसाठी गळ्यातील हार, वुलन्स साहित्य आदी सर्व प्रकारच्या साहित्याची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे.

धनसिग राजपुरोहित यांनी सांगितले की, नवीन डिझाइन्सना ग्राहकांची अधिक मागणी आहे. आमच्याकडे दहा रुपयांपासून पुढे घ्याल तसे अधिक किंमतीचे साहित्य उपलब्ध आहे. नवीन डिझाइन्सचे पडदे, लाईटच्या माळा आदींना चांगली मागणी आहे.

गणरायाला प्रिय असलेले मोदक, लाडू, जास्वंदीची फुले, श्रीफळ, यासह गणेशमूर्तीसमोर ठेवली जाणारी विविध फळे, फुले विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या फुलांचे गुंफे बनवून तीस रुपयांना विकण्यात येत होते.

फुले व फळांचा मोठा व्यापार सुरु आहे. गणेशासमोर ठेवण्यासाठी केळी, सफरचंद, चिकू, सिताफळ, मोसंबी आदी फळांचा व्यापारही जोरात होता. ग्राहकांच्या सोयीसाठी व्यापारी पाच प्रकारची फळे प्रत्येकी दीडशे रुपये दराने विकत आहेत. त्याचप्रमाणे लोकांनी शेवंती, गुलाब, झेंडू, जास्वंद या फुलांची अधिक खरेदी केली.

एकूणच, कुंदनगरी गणेशाच्या पूजेसाठी पूर्णपणे सज्ज झाली असून, सोमवारी काही घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, प्रथेप्रमाणे उद्या अनेक लोक बाप्पांची प्रतिष्ठापना करणार आहेत. सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मंगळवारी होणार आहे.

Tags: