बेळगावातील गणेशोत्सव मंडळांकडून पर्यावरणपूरक गणेश पूजनाची प्रथा सुरु झाली आहे. त्यातूनच जुने गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील सिद्धाप्पा आनंदाचे यांनी यंदा चक्क रुद्राक्षापासून 12 फूट उंचीची सुंदर गणेश मूर्ती साकारली आहे. त्याचा हा वृत्तांत…
होय, बेळगावच्या गणेशोत्सवाला एक अनोखी परंपरा आहे. देशातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापलं लोकमान्य टिळक यांनी 1905मध्ये बेळगावात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. तेंव्हापासून आजवर अव्याहतपणे विविध सामाजिक, पर्यावरणपूरक उपक्रम राबवून बेळगावात गणेशोत्सव साजरा केला जातोय. हीच परंपरा सुरु ठेवत अनेक मंडळांनी आजच्या आधुनिक काळात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा पायंडा पाडला आहे. त्याला मूर्तिकारांची तितक्याच उत्साहाने प्रतिसाद दिला आहे.
बेळगावातील जुने गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील सिद्धाप्पा आनंदाचे यांनी गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची आवड जपली आहे. अक्रोडपासून, मोदकांपासून, सुका मेवा, पेपरग्लास, फुले, धान्य आणि चक्क रेतीपासून श्रीमूर्ती त्यांनी यापूर्वी बनवल्या आहेत. हीच परंपरा कायम ठेवत त्यांनी यंदा चक्क रुद्राक्षापासून 12 फूट उंचीची भव्य आणि सुंदर गणेश मूर्ती साकारली आहे.
याबाबत इन न्यूजला माहिती देताना मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी सांगितले की, पीओपी हे पर्यावरणासाठी अत्यंत घटक असल्याने मी केवळ पर्यावरणपूरक घटकांपासून गणेश मूर्ती बनवतो. कोविड काळातील अपवाद वगळता यापूर्वी मी अक्रोडपासून, मोदकांपासून, सुका मेवा, पेपरग्लास, फुले, धान्य आणि चक्क रेतीपासून श्रीमूर्ती बनवल्या आहेत. यंदा रुद्राक्षापासून 12 फूट उंचीची भव्य आणि सुंदर गणेश मूर्ती बनवली आहे. व्यवसायाने प्लंबर असल्याने रोज तास-अर्धा तास वेळ मिळेल तसे काम केले.
कागद आणि पुठ्ठ्यापासून आकार तयार करून त्यावर रुद्राक्ष बसवले आहेत. दीड ते दोन महिने यासाठी लागले आहेत. या कामात मला मित्र आणि परिसरातील महिलांनीही मदत केली आहे. त्यामुळे मी एकट्याने ही मूर्ती बनवली आहे असे म्हणणार नाही. नानावाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी ही मूर्ती बनवली आहे. येत्या शनिवारी किंवा रविवारी मंडळाचे कार्यकर्ते श्रीमूर्ती घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर, बेळगावात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजू लागली आहे. हेच सुनील आनंदाचे यांनी बनवलेल्या गणेशपूर्तीवरून सिद्ध होते. सर्वच उत्सव मंडळांना बुद्धीदात्या गणरायाने अशी बुद्धी द्यावी हीच अपेक्षा.


Recent Comments