Belagavi

आसदखान सोसायटीतील ‘तो’ ब्लॅक स्पॉट हटवला

Share

बेळगावातील आसदखान सोसायटीतील कचरा टाकण्यात येत असलेला ब्लॅकस्पॉट हटवण्यात बेळगाव महापालिकेला अखेर यश आले आहे. रहिवाशांत सतत जागृती करून, कचरा टाकणाऱ्यांना प्रतिबंध करून, दंड आकारून ही किमया करण्यात आली.

बेळगाव महापालिकेने आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शहरात ब्लॅकस्पॉट हटवण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरु केली आहे. त्यातूनच सर्व 58 प्रभागातील अनेक ब्लॅकस्पॉट हटवून कचरा टाकण्याच्या जागेचे सुशोभीकरण करून नागरिकांत जागृती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुडा कार्यालयामागील आसदखान हौसिंग सोसायटी परिसरातील ब्लॅकस्पॉट देखील आज स्थानिकांच्या मदतीने हटवण्यात आला. या ठिकाणी फुलांच्या माळा लावून सजावट करून कचरा न टाकण्याचे आवाहन करणारा फलक लावण्यात आला. यासाठी आसदखान हौसिंग सोसायटी यंग कमिटी आणि रहिवाशांचेही सहकार्य लाभले आहे.

यावेळी बोलताना महापालिकेचे पर्यावरण अधिकारी कलादगी यांनी सांगितले की, बेळगाव पालिकेतर्फे सर्व 58 प्रभागातील अनेक ब्लॅकस्पॉट हटवून कचरा टाकण्याच्या जागेचे सुशोभीकरण करून नागरिकांत जागृती करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत 100हुन अधिक ब्लॅकस्पॉट हटवले असून कचरा टाकणाऱ्या लोकांना सुमारे एक लाख रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला आहे. शहरात कचरा साठणे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असल्याने नागरिकांच्या हितासाठीच ही मोहीम उघडली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच ओला व सुका कचरा वेगळा करून पालिकेच्या कचरा गाडीकडे द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

नगरसेवक बाबाजान मतवाले म्हणाले की, आसदखान सोसायटीतील ब्लॅकस्पॉट हटवण्यासाठी येथील यंग कमिटीचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांचे सहकार्य लाभले आहे. नागरिकांच्या हितासाठी मनपा आयुक्त, महापौर-उपमहापौर, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेळगावात ही मोहीम राबवली आहे. त्याचे गांभीर्य समजून घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे. बाईट.
यावेळी बोलताना कचऱ्याची उचल करणाऱ्या पौरकार्मिकांनी, बेळगावातील नागरिकांनी त्यांच्या हितासाठी खुल्या जागेत कचरा टाकून ब्लॅकस्पॉट निर्माण करण्याऐवजी पालिकेच्या कचरासंकलन गाड्यांकडे कचरा द्यावा असे आवाहन केले.

यावेळी पुंडलिक राठोड, समीर तुंबडी, अब्बास मोमीन, मुझम्मिल मंगल, रघु बैंगनकट्टी, आसदखान यंग कमिटीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: