Belagavi

महापौर-उपमहापौर, आयुक्तांकडून विसर्जन मार्गाची पाहणी

Share

लाडक्या गणरायाचे आगमन आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने श्रीच्या आगमन आणि विसर्जन सोहळ्याची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आणि पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज गणेश मंडळांचे पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत श्री विसर्जन मार्ग आणि तलावांची पाहणी केली.

अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक गणपतींची बेळगावात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठापना करण्यात येते. पुणे-मुंबईनंतर आणि कर्नाटकात सर्वाधिक भव्यतेने बेळगावातच गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगर पालिकेने सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विरजण मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविणे, खडे बुजविणे, तलावांची चोख व्यवस्था ठेवणे या कामांना युद्धपातळीवर प्रारंभ केला आहे. या संदर्भात आज महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आणि पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी व मनपा, हेस्कॉम आदी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत श्री विसर्जन मार्ग आणि तलावांची पाहणी केली.

समादेवी मंदिरात पूजन करून या पाहणी दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, स्टेशन रोड, कपिलेश्वर उड्डाण पूलमार्गे कपिलेश्वर विसर्जन तलाव या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या तसेच केबल वायर्स हटविण्याच्या सूचना हेस्कॉम आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता सुरळीत करून देण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर शोभा सोमनाचे यांनी सांगितले की, श्री विसर्जन मिरवणुकीत कसलेही विघ्न येऊ नये यासाठी महापालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी मार्गावरील खड्डे बुजविण्यासह तलाव दुरुस्ती-सफाई व अन्य कामांसाठी मनपाने विशेष निधी मंजूर केला आहे. श्रीचा आगमन आणि विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी सर्व समस्या सोडवून पूर्वतयारी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी आज उपमहापौर, आयुक्त आणि दोन्ही गणेश महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आज पाहणीदौरा काढल्याचे त्यांनी सांगितले. बाईट.
पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की, जिल्हा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दीड महिन्यापूर्वी झालेल्या पूर्वतयारीच्या बैठकीत गणेशोत्सव महामंडळ, उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यांची दखल घेऊन सर्व पूर्वतयारी मनपातर्फे करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार विसर्जन तलाव, मार्गाची दुरुस्ती, अडथळे हटविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यासंदर्भात आज पुन्हा एकदा पाहणीदौरा केल्याचे आयुक्तांनी सांगितले.

लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, बेळगावचा प्रसिद्ध गणेशोत्सव भक्तिपूर्ण वातावरणात सुरळीत पार पडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीतील सूचनांनुसार प्रशासनाने, महापालिकेने व संबंधित खात्यांनी काम सुरु केले आहे. विशेष म्हणजे आमच्या सूचनांची अधिकारी तातडीने दखल घेऊन कार्यवाही करत आहेत. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. सर्वानी हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मनपा सत्ताधारी गट नेते राजशेखर डोनी, नगरसेवक गिरीश धोंगडी, नितीन जाधव, राजू भातकांडे, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी अर्जुन रजपूत, सुनील जाधव तसेच महापालिका, पोलीस, हेस्कॉम, वन आदी खात्यांचे अधिकारी व कर्मचारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: