Belagavi

काँग्रेसमध्ये जाण्याची गरज नाही, तिकीट दिल्यास लोकसभा लढवू : अनिल बेनके

Share

मला काँग्रेसमध्ये जाण्याची गरज नाही. सत्तेसाठी मी पक्ष सोडणार नाही. पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिल्यास निवडणूक लढवू असे स्पष्टीकरण माजी आमदार अनिल बेनके यांनी दिले.

अनिल बेनके नाराज आहेत, ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत अशा वावड्या उठल्या आहेत. याबाबत आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, हे खोटे आहे, काल प्रसारमाध्यमातून प्रसारित झालेल्या बातम्या ऐकून मला वाईट वाटले, मी 25 वर्षे भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी 3 वेळा तिकीट मागितले आहे. पण 2018 च्या निवडणुकीत मला तिकीट मिळाले आणि मी जिंकलो असे ते म्हणाले.

2008 आणि 2013 मध्ये तिकीट न मिळाल्याने अनेकजणांनी पक्ष सोडला. पण मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, मी पक्ष सोडण्याचा विचार करत नाही. मी जगदीश शेट्टर अथवा अन्य कोणत्याही काँग्रेस नेत्याची भेट घेतलेली नाही, माझा त्यांच्याशी संपर्कही नाही. माझ्या काँग्रेस प्रवेशाबाबतची सर्व वृत्ते खोटी आहेत असे अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.

पक्षाची इच्छा असेल तर मी लोकसभा निवडणूक लढवणार, पुढच्या आठवड्यात दिल्लीत जाऊन चर्चा करेन, आमच्याकडे तिकीटासाठी इच्छुक असलेले अनेक लोक आहेत, पक्षाने कोणालाही तिकीट दिले तरी याचा मला आनंद आहे, पण कोणत्याही कारणासाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. असे बेनके यांनी स्पष्ट केले.

Tags: