Belagavi

बेळगावात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रयत संघाची निदर्शने

Share

बेळगाव तालुक्यातील अगसगे गावात 110 केव्ही वीज वितरण केंद्र सुरु करावे, शेतीसाठी दिवसा अखंड सात तास वीजपुरवठा करावा आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ बेळगाव तालुका शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

बेळगाव तालुक्यातील काकती गावात 110 केव्ही वीज वितरण केंद्र असले तरी तेथून अगसगे व परिसरातील घरे आणि शेतीला समर्पक वीज पुरवठा होत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे अगसगे गावातच असे केंद्र सुरु करावे, शेतीच्या सिंचनासाठी रात्री तीन तास वीज पुरवण्याऐवजी दिवसा वीज पुरवावी या मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ बेळगाव तालुका शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रयत संघाचे नेते कलगौडा बाळगौडा पाटील यांनी सांगितले की, अगसगे परिसरातील गावांना समर्पक वीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक समस्या उदभवत आहेत. त्या निवारण्यासाठी अगसगे गावातच 110 केव्ही वीज वितरण केंद्र सुरु करावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी गावकरी आवश्यक जागा देण्यास तयार आहेत. याशिवाय अगसगे परिसरातील शेतीला सिंचनासाठी रात्री तीन तास वीजपुरवठा केला जातो. मात्र तोही खंडीत स्वरूपाचा असतो. त्यामुळे दिवसा नियमित सात तास वीज पुरवावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी रयत संघाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर शेतकऱ्यांतर्फे बेळगाव जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वैजू हालेनावर, वैजू लमाणी यांच्यासह अगसगे, कडोली परिसरातील शेतकरी, रयत संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: