श्रावण महिन्यात सर्वात आधी येणारा सण म्हणजे नाग पंचमी होय. बेळगाव तालुक्यातील गावोगावी आपापल्या पद्धतीने हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी नागदेवतेच्या मूर्ती बनविण्याची लगबग मूर्तिकार कुटुंबात सुरु आहे.
होय, कडाडणाऱ्या डमरूसोबत “हर हर नमुस करा श्रावण महिन्याचा जीत नागोबा खरा” अशी आरोळी देत आलेला गारुडी रंगात येऊन नागाला खेळवतानाचे दृश्य पूर्वी गावोगावी दिसून येत होते. टोपलीत ठेवलेले नाग, धामण, त्याला खुंटयाला बांधलेले मुंगूस, चमत्कारिक दिसणारी बाहुली, कवटी आणि हाडे अशा साहित्यासोबत गारुडी आपला खेळ रंगवत जाई.
फूंक मारून टोपलीतला नाग उभा केला की श्रध्देने हात जोडले जात असत आणि पुंगीच्या तालावर डोलणारा नाग सर्वांना आश्चर्यचकित करत असे आता हे चित्र दुर्मिळ झाले आहे. मात्र बेळगाव शहरासह गावोगावी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्याची प्रथा मात्र आजही टिकून आहे.
बेळगाव शहरातील जुने बेळगाव इथल्या लक्ष्मी मंदिरातील हे दृश्य पहा, येथे युवक शेतातील काळी माती आणून नाग बनवतात. नागाच्या साच्यात नागमूर्ती तयार करून त्या घरोघरी वितरीत केल्या जातात. त्यानंतर घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. गावातील सुतार समाजाकडून काळ्या माती मध्ये नाग बनवण्याची परंपरा आजही अनेक गावात आहे. सुतार बंधूंना तांदूळ देऊन त्यांच्याकडून आळू किंवा भोपळ्याच्या पानातून नाग घरी आणला जातो.
नाग पंचमी रोजी लहान मुले-मुली, युवती व महिला झोपाळे बांधून झोके खेळण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेय. आजही जर खेडेगावात नागपंचमीवेळी प्रत्येक घरात झोपाळे बांधलेले चित्र पाहायला मिळते.
नागपंचमी निमित्त विवाह झालेल्या सासुरवाशिणी मुली माहेरी येतात आणि आवडीने हा सण घरात साजरा होतो. घरातील महिलांकडून लाडू, तंबिट, लाह्या आदी खाद्य पदार्थ बनवले जातात. अनेक गावातून नाग पंचमी निमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. एकूणच श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणारा हा सण अनेक खेळ आणि आनंद घेऊन येत असतो.


Recent Comments