स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘आमची माती आमचा देश’ मोहिमेंतर्गत स्वातंत्र्यवीरांची गावे, नद्यांतून तसेच ऐतिहासिक स्थळांवरून आणलेल्या मातीच्या कलशांची भव्य मिरवणूक बेळगावात काढण्यात आली. दिल्लीत स्वातंत्र्यवीरांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या अमृतवाटीकेसाठी ही माती पाठवून देण्यात आली.
शहरातील चन्नम्मा चौकात बेळगाव महानगर पालिकेच्या वतीने आयोजित मिरवणुकीचे खासदार मंगल अंगडी, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महापौर-उपमहापौरांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर भारतमातेच्या वेशात कलश घेऊन उभी राहिलेल्या मुलीचे पूजन केले. श्रीफळ वाढवून पूजनानंतर मृद कलश मिरवणुकीला चालना देण्यात आली. चन्नम्मा चौकापासून सुरु झालेली मिरवणूक कुमार गंधर्व कला रंगमंदिरात समाप्त झाली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की, भारत सरकार आणि कर्नाटक सरकारच्या निर्देशांनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ते २० ऑगस्टपर्यंत ‘आमची माती आमचा देश’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात शाळांमध्ये मृदसंकलन, शपथविधी, वृक्षारोपण, मातीसोबत सेल्फी, शाळांमध्ये निबंध, भाषण, नृत्य आदी स्पर्धा व प्रामुख्याने ऐतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यवीरांची गावे आणि नद्यांमधून मातीचे संकलन करण्यात आले. ही माती कलशांत भरून जिल्हा योजना संचालकांकडे देण्यात आली. ते पुढे राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडे व नंतर तेथून दिल्लीत स्वातंत्र्यवीरांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या अमृतवाटिका बागेसाठी पाठवून देण्यात येणार आहे. त्यासाठी आज हा उपक्रम राबवला असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट.
महापौर शोभा सोमनाचे यांनी या उपक्रमात सहभागी होऊन खूप आनंद झाल्याचे सांगितले. मुलांपासून ते मोठ्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी सरकारने हा चांगला उपक्रम घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

खासदार मंगल अंगडी म्हणाल्या की, देशभरातील विविध पवित्र ठिकाणांहून गोळा केलेली माती दिल्लीतील नियोजित स्वातंत्र्यवीर स्मृती अमृतवाटिका या बागेसाठी वापरण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाविषयी प्रेम, अभिमान जागृत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पालिका उपयुक्त भाग्यश्री हुग्गी, नगरसेवक, नगरसेविका, पालिका अधिकारी, कर्मचारी व शालेय विध्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Recent Comments