Belagavi

मनपा आयुक्तांनी हटवले शहरातील पाच ब्लॅकस्पॉट

Share

बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आपला मॉर्निंग व्हिजिटचा उपक्रम सुरूच ठेवला असून आज त्यांनी सदाशिवनगर, आझमनगर भागात भेट देऊन पाच ब्लॅकस्पॉट हटवून कचरा समस्येची पाहणी करून आरोग्य निरीक्षकांना सूचना दिल्या. त्याशिवाय आझमनगर येथील इंदिरा कँटीनला भेट देऊन खाद्यपदार्थांचा दर्जा तपासला.

महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आज शनिवारी सकाळी 5-45 वाजता सदाशिव नगर येथील वाहन शाखेत जाऊन वाहनधारकांची उपस्थिती तपासली. त्यानंतर आझमनगर बिट कार्यालयास भेट देऊन पौरकार्मिकांची उपस्थिती तपासली आणि आरोग्य निरीक्षकांना निर्देश दिले. त्यानंतर आझमनगर इंदिरा कँटीनला भेट दिली. यावेळी त्यांनी किचनची पाहणी करून, स्वतः नाश्ता करून नाश्त्याचा दर्जा तपासला व इंदिरा कँटीनच्या पर्यवेक्षकांना दर्जेदार जेवण तयार करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर नगर सेवक श्रेयस नाकाडी यांनी प्रभाग क्र.34 मधील आझमनगर, संगमेश्वर नगर, शाहू नगर येथील कचराकोंडीची पाहणी केली व रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित आरोग्य निरीक्षकांना दिले. अनेक ठिकाणी खुल्या जागांवर कचरा टाकला जात असल्याने स्वच्छता राखण्यासाठी खुल्या जागांच्या मालकांना नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य निरीक्षकांना दिले. नंतर त्यांनी हॉटेलला भेट देऊन मालकाला स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर पालिका आयुक्तांनी श्रीनगर गोशाळा व एबीसी सेंटरला भेट देऊन पशुवैद्यकीय निरीक्षकांकडून माहिती घेतली. मोठया प्रमाणात भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यास तसेच परिसर योग्य व स्वच्छ ठेवण्यास सांगितले व आज सर्व निरीक्षकांना हॉटेलची पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या.

आयुक्तांच्या निर्देशानुसार आज नेहरू नगर बसवन मंदिराजवळील ब्लॅक स्पॉट, वीरभद्र नगर डबल रोड रोडवरील दोन ब्लॉक स्पॉट आणि शिवाजीनगरमधील दोन ब्लॉक स्पॉट कायमस्वरूपी साफ करून रोपे लावण्यात आली.
बेळगाव शहरातील अनेक खुल्या जागा म्हणजे कचऱ्याचा ढीग बनल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी इमारत परवाना नियमांच्या उल्लंघनाची नोटीस संबंधित जागामालकांना बजावली.

Tags: