बेळगाव शहरातील गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि संबंधित विभागांनी सर्व तयारी केली आहे. गणेश उत्सव मंडळांनीही हा सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
बेळगाव महानगर पालिकेत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक सोमवारी सायंकाळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी विविध उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे सल्ले व सूचना ऐकून घेतल्यावर बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले, मंडळांच्या सुचनांनुसार गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते, दुरुस्ती वेगाने करण्यात येईल. यासाठी टेंडरही काढले आहे. तलावांचीही दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात येत आहे. उत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी ८ ठिकाणी सिंगल विंडो कार्यालये सुरु करण्यात येतील. तेथे मंडळांना तातडीने परवानग्या देण्याची सूचना मंत्र्यांनी केली.
उत्सवकाळात गणपती बघण्यासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी व अन्य आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय करण्यात येईल असे सांगून प्रत्येक दोनशे मीटर अंतरावर महिलांसाठी इ-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना केली. गणेशभक्त, उत्सव मंडळांच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांना बंदोबस्ताच्या नावाखाली विनाकारण त्रास न देण्याची सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली. त्याचप्रमाणे एक-दोन मंडळांमुळे विसर्जन मिरवणुकीस होणाऱ्या विलंबावर नाराजी व्यक्त करून सर्व मंडळांनी मिरवणुकीत लवकर दाखल व्हावे अशी सूचना मंत्री जारकीहोळी यांनी केली.

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी, मंडळांच्या सूचनांचा अभ्यास करून आवश्यक सुविधा देण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांसमवेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह मिरवणूक मार्गाची पाहणी करून तेथील अडचणी दूर करण्यात येतील असे सांगितले.
.
यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी विजय जाधव, सुनील जाधव, मल्लेश चौगुले आदींनी विविध सूचना केल्या.
बैठकीला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, डीसीपी स्नेहा, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी यांच्यासह शहर-परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments