वर्षातून एकदाच येणाऱ्या गणरायाच्या आगमनाला आता अवघा दीड महिना उरलाय. सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पांची प्रतीक्षा लहानथोर सगळ्यांनाच लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरात गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला आता वेग आला आहे.
सर्व विघ्ने दूर करणाऱ्या, सगळ्यांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता केवळ दीड महिना बाकी आहे. त्यामुळे घरोघरी गणरायाच्या जंगी स्वागताचे बेत आखले जात आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी, सदस्यांच्या बैठकांना वेग आला आहे. त्याचप्रमाणे गणेशमूर्तींचे काम लवकरात लवकर उरकण्यासाठी मूर्तिकारांचीही लगबग सुरु आहे. अनेक मूर्तिकारांनी स्वतः मूर्ती बनवल्या आहेत. तर काही मूर्तीकारांनी पेण, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांहून कच्च्या मूर्ती आणून त्यांचे घासकाम, फिनिशिंग, रंगकाम पूर्ण करण्यास युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. एकंदर, बेळगावातील बहुतेक श्री मूर्तिकारांच्या कार्यशाळा सध्या गजबजल्याचे पहावयास मिळते.
या संदर्भात इन न्यूजला माहिती देताना चव्हाट गल्ली येथील मूर्तिकार प्रवीण राणे यांनी सांगितले की, गेल्या 16 वर्षांपासून मी गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन हे काम करत आहे. मंडळांकडून प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मोठ्या आणि लहान घरगुती मूर्ती पेणहून आणून त्यांचे रंगकाम करून त्यांची विक्री करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही गरुडारूढ, सिंहासनारूढ, सिंहावर आरूढ, अयोध्या राममंदिर पार्श्वभूमी असलेल्या अशा

अनेक प्रकारच्या मूर्ती गणेशभक्तांच्या आवडीनुसार बनवल्या आहेत. यंदा रंगासह कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्याशिवाय गाडीभाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशमूर्ती गेल्यावरहाच्या तुलनेत महागल्या आहेत. पेणमध्ये कच्च्या मूर्तींचे दर कमी आहेत. त्यामुळे त्या मूर्ती आणून रंगकाम करून भक्तांना परवडेल अशा दरात दिल्या जातात. लहानमोठ्या अशा साधारण दोनशे श्रीमूर्ती यंदा बनवल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
शहापूर खडेबाजार गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते अभिजित चिक्कोर्डे यांनी सांगितले की, यंदा आमच्या मंडळाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गणपती बाप्पांचा भव्य आगमन सोहळा आम्ही आयोजित केला आहे. त्यासाठी आम्ही मूर्ती बघायला येथे आलो आहोत असे सांगितले.

एकंदर, दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातील गणेश मूर्तिकारांच्या कार्यशाळा आता गजबजल्या आहेत. लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे.


Recent Comments