Belagavi

लोकसभेसाठी तयारीच्या हायकमांडकडून सूचना : सतीश जारकीहोळी

Share

लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याची सूचना हायकमांडने केली आहे. गेल्यावेळी प्रमाणे इच्छुकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आठवड्यात तीनवेळा दिल्लीवारी केल्याबद्दलच्या पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, काँग्रेस श्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मागील निवडणुकीप्रमाणे तयारी करू, सगळ्या इच्छुकांशी चर्चा करू. आपणाला लोकसभा लढण्याची सूचना दिलेली नाही. कोणी मागणी केली नाही किंवा दबाव आणलेला नाही. केवळ तयारी करण्यास सांगितले आहे. त्या निवडणुकीला अजून दहा महिने आहेत, येईल तेंव्हा पाहू असे त्यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वर्णावरून केलेल्या टीकेबाबतच्या प्रश्नावर, भाजपवाले असे नेहमीच बोलतात, त्यात नवे काही नाही. आता ज्ञानेंद्र यांनी विधान मागे घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचार सुरु असल्याच्या माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना यात काही नवे नसल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावातील उद्यमबाग पोलिसांनी एका युवकावर हल्ला केल्याच्या प्रकरणासंदर्भात याची मला कल्पना आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यवाही करत आहेत असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आपल्यात कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डीडीपीआय बदलीचा विषय आपण आमदार राजू सेठ यांच्यावर सोडला आहे असे त्यांनी सांगितले. बेळगाव-गोवा महामार्गावर गणेबैल टोल नाक्यासंदर्भात जाडा टोल आकारणीसह अनेक तक्रारी आहेत. जिल्हाधिकारी हा विषय हाताळत असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले

एकंदर, अद्याप आपल्याला लोकसभा निवडणूक लढविण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी दिली नसल्याचे सांगून मंत्री सतीश जारकीहोळी यांनी याबाबत गौप्य राखले आहे.

Tags: