Belagavi

वीज दरवाढीच्या निषेधार्थ चव्हाट गल्लीच्या रणरागिणींचा मोर्चा

Share

वीज दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगावात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्याचप्रमाणे आज बेळगाव येथील चव्हाट गल्लीतील रणरागिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कोणत्याही सामाजिक समस्येवर बुलंद आवाज उठवणाऱ्या बेळगावातील चव्हाट गल्लीतील रणरागिणींनी आज वीजदरातील भरमसाठ वाढीच्या निषेधार्थ जोरदार आवाज उठवला. वीजदर वाढीच्या निषेधार्थ त्यांनी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दरवाढ कमी करण्याची मागणी केली

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाट गल्ली महिला मंडळाच्या अध्यक्षा आक्काताई सुतार म्हणाल्या की, या महिन्याचे वीज बिल एरव्हीच्या मासिक वीज बिलाच्या 3 पटीने जास्त असल्याने सर्वांचेच हाल होत आहेत. यापूर्वीचे वीज बिल 500 रुपये असेल तर त्याच्या 3 पट जास्त बिले आली आहेत. आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब लोक आहेत, त्यांनी जगायचे कसे? असा सवाल त्यांनी केला. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली. पाणीपुरवठा प्रकल्प एल अ‍ॅण्ड टीला दिल्यानंतर पाणी पुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. त्याशिवाय ड्रेनेज पाणी मिश्रित पाणी नळांना येत आहे. या दोन्ही समस्या सरकारने लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.


त्यानंतर चव्हाट गल्लीतील रहिवासी शिल्पा बलाटेकर यांनी सांगितले की, वीज बिल वाढल्याने खूप त्रास होत आहे. भाड्याच्या घरात राहून आमच्या मुलांच्या शाळेच्या फीचा तसेच दैनंदिन खर्च भागवण्याची अडचण होत आहे. त्यामुळे विजेचे दर कमी करावेत, अन्यथा आम्ही बिल भरणार नाही. सरकार 200 युनिट मोफत देण्याचे सांगत आहे. वीज, पण ते विजेचे दर वाढवत आहे. ते मोफत वीज देतीलच याची शाश्वती नाही.

या मोर्चात चव्हाट गल्ली व परिसरातील सर्व वयोगटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Tags: