राष्ट्रीय मराठा पार्टी कर्नाटक विधानसभेच्या 50 जागा लढविणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील-होनाळीकर यांनी दिली.
बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील-होनाळीकर यांनी सांगितले की, 25 मार्च 2019 रोजी राष्ट्रीय मराठा पार्टीला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. एससी-एसटीला घटनेनुसार 50% आरक्षण दिले आहे. मात्र मराठा, ब्राह्मण, लिंगायत आदी अन्य समाजातही अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांना त्या आधारावर आरक्षण मिळावे हा आमच्या पक्षाचा मुख्य अजेंडा आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात रस्ते, पिण्याचे पाणी, समर्पक पीक नुकसान भरपाई मिळवून देणे आदी हेतूने पक्ष निवडणूक लढवीत आहे.
यापूर्वी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या प्रत्येकी 5 जागा राष्ट्रीय मराठा पक्षाने लढविल्या आहेत. आता कर्नाटक विधानसभेच्या 50 जागा लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे, आर्थिकदृष्ट्या मागास विध्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे, नागरिकांना इस्पितळ, रुग्णवाहिका, पिण्याचे शुद्ध पाणी आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देणे याला आमचे प्राधान्य राहील असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय मराठा पक्षाचे कर्नाटक प्रभारी शार्दूल तोडकर, एससी प्रदेशाध्यक्ष सुहास हिरेमनी, डॉ. प्रकाश खांडेकर, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments