Delhi

अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना भाजप देणार संधी : मुख्यमंत्र्यांचे संकेत

Share

भारतीय जनता पक्षाच्या बहुप्रतीक्षित उमेदवार यादीत अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना याचे संकेत दिले. पक्षाच्या या निर्णयानुसार किमान 16 विद्यमान मंत्री व आमदारांना घरी बसवण्यात येणार असल्याचे समजते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. प्रामुख्याने बंडखोरी आणि पराभव टाळण्यासाठी सत्ताधारी भाजपने सावधपणे पावले उचलण्याचे तंत्र अवलंबले आहे. त्यामुळेच कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करूनही भाजपने अद्याप आपली पहिली यादीदेखील जाहीर केलेली नाही. गेल्या एक-दोन दिवसांपासून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, माजी मुख्यमंत्री व भाजप संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस. येडियुरप्पा असे बिनीचे नेते राजधानी दिल्लीत तळ ठोकून आहेत. उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु आहे.

काल रविवारी रात्री पक्षाच्या बड्या नेत्यांसोबत उमेदवारी यादीसंदर्भात बैठक झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, सी. टी. रवी आदी नेत्यांची बैठक पार पडली. अमित शाह यांच्यासोबत सुमारे अर्धा तास चर्चा केल्यानंतर या नेत्यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा केली. या दोन्ही बैठकांत उमेदवारी देताना अधिकाधिक नव्या चेहऱ्यानं संधी देण्याबाबत जोर देण्यात आल्याचे समजते. नड्डा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्री बोम्मई यांनी याचे संकेत दिले. “उमेदवार अंतिम करण्यात कसला गोंधळ, गडबड नाही, उमेदवारांचे ग्राऊंड रिपोर्ट घेऊन यादी निश्चित करण्यात येत आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उमेदवारी देण्यापूर्वी इच्छुकांचे रेकॉर्ड, जनतेत त्यांच्याविषयी असलेला मतप्रवाह, स्वच्छ पार्श्वभूमी, काँग्रेस-जेडीएसच्या बड्या नेत्यांना टक्कर देण्याची त्यांची क्षमता आहे की नाही आदी सर्व मुद्दे विचारात घेऊन प्रामुख्याने बंडखोरी आणि पराभव टाळण्यासाठी सत्ताधारी भाजपने सावधपणे पावले उचलण्याचे तंत्र अवलंबले आहे. यासाठी भाजपने पक्षांतर्गत सर्व्हे तर केलेला आहेच, पण रा. स्व. संघानेदेखील केलेल्या सर्व्हेचा आधार घेण्यात येत आहे. त्यामुळेच भाजपच्या यादीला विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही असले तरी, यावेळी उमेदवारी देताना अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतलाय. खुद्द मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही त्याचे संकेत दिले आहेत.

Tags: