Belagavi

शिवबसव नगरातील श्री जोतिबा मंदिरात भव्य महाप्रसाद

Share

बेळगावातील शिवबसव नगरातील श्री जोतिबा मंदिरात चैत्री यात्रेनिमित्त भव्य महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन केले होते. बेळगाव शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे 20 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

महाराष्ट्राचे कुलदैवत, कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री जोतिबा देवाची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेला बेळगावच्या चव्हाट गल्लीतील देवदादा सासनकाठीला मोठा मान आहे. या सासनकाठीसोबत चव्हाट गल्ली व बेळगावातील जोतिबा भाविक नुकतेच यात्रेला पायी चालत जाऊन आले. या पायी यात्रेत 12 बैलगाड्यांचा सहभाग होता. जोतिबाची डोंगरावरील यात्रा आटोपून या मानाच्या सासनकाठीचे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शिवबसव नगरातील जोतिबा मंदिराच्या प्रांगणात आगमन झाले. त्यानिमित्त आज दुपारी भाविकांसाठी भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला. बेळगाव शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे 20 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

यासंदर्भात ‘आपली मराठी’ला अधिक माहिती देताना मंदिराचे विश्वस्त माजी नगरसेवक ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले की, कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगरावर चव्हाट गल्लीच्या सासनकाठीला मानाची सासनकाठी म्हणून मोठी प्रतिष्ठा आहे . दरवर्षी या सासनकाठीसोबत चव्हाट गल्ली व बेळगाव परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात पायी जाऊन जोतिबा यात्रेत सहभागी होतात. तेथून यात्रा आटोपून सासनकाठी शिवबसव नगरातील जोतिबा मंदिरात आल्यावर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या यात्रेनंतर सासनकाठीचे आज सकाळी आगमन झाल्याने महाप्रसाद आयोजित करण्यात आला. याचा सुमारे 20 हजार भाविकांनी लाभ घेतला आहे. बेळगाव शहर, तालुका आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील भाविकांनीही महाप्रसादाला हजेरी लावल्याचे त्यांनी सांगितले.

महाप्रसाद सुरळीतपणे पार पडण्यासाठी चव्हाट गल्लीतील युवक, नागरिकांनी शिस्तबद्ध संयोजन केले होते. कसल्याही प्रकारे गडबड-गोंधळ न होता रांगेत थांबून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी भाविकांनीही सहकार्य केले. जोतिबा मंदिराच्या प्रांगणात भव्य मांडव घालून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Tags: