Belagavi

नागरी सुविधांसाठी मतदानावर बहिष्काराचा इशारा

Share

कणबर्गी येथील कर्नाटक हौसिंग बोर्डाच्या वसाहतीत किमान नागरी सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय.

बेळगावातील कणबर्गी येथील कर्नाटक हौसिंग बोर्डाच्या वसाहतीत स्वच्छता, पथदीप, समर्पक पाणी पुरवठा, चांगले रस्ते देण्याच्या मागणीसाठी येथील रहिवाशी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र त्याला महानगरपालिकेकडून प्रतिसाद देण्यात येत नाहीय. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून रहिवाशांनी येत्या 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतलाय. रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केले.

यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना रहिवासी नागनगौडा बसवनगौडा पाटील यांनी सांगितले की, सुमारे 25 वर्षांपूर्वी कर्नाटक गृहनिर्माण मंडळाने कणबर्गी वसाहतीतील 535 भूखंड वाटले होते. त्यापैकी सुमारे 60% भूखंडांवर घरे बांधण्यात आली असून, लोकवस्ती वाढली आहे. 3 वर्षांपूर्वी ही वसाहत बेळगाव महानगर पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र मनपाकडून येथे किमान नागरी सुविधा देण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात आम्ही यापूर्वी मनपाला, आमदार आणि नगरसेवकांना निवेदने दिली आहेत. त्यांनी येऊन पाहणी करून मनपाला सूचना दिली आहे. मात्र तरीही या वसाहतीत केवळ 3 दिवसांतून एकदा कचरा उचलणे सोडले तर कुठल्याच सुविधा दिल्या जात नाहीत. या ठिकाणी रोजच्या रोज कचरा उचल, सफाई, पथदीप, पुरेशा दाबाने समर्पक पाणी पुरवठा आणि खड्डे बुजवून चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र या सोयी दिल्या जात नसल्याने आम्ही रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदर, नागरी सुविधांच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची वेळ रहिवाशांवर येणे हे दुर्दैवी आहे. आता मनपा यावर कोणती भूमिका घेणार हे पहावे लागेल.

Tags: