Delhi

भाजपच्या कोअर ग्रुपची आज बैठक; काँग्रेसची तिसरी यादी कधी जाहीर होणार?

Share

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि जेडीएस हे तिन्ही पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष कार्यकारिणीची बैठक सुरु झाली आहे. तर काँग्रेसची तिसरी यादी कधी जाहीर होणार? याकडे काँग्रेसच्या इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिल्लीत शुक्रवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली. तीत कर्नाटकातील उमेदवारांच्या नावांबाबत विचारमंथन करण्यात आले. जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरात निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, सह-प्रभारी मनसुख मांडविया, गुजरात प्रभारी सरचिटणीस अरुण सिंह, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा या बैठकीस उपस्थित होते. कर्नाटकबाबत भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक आज होणार आहे.

दुसरीकडे कर्नाटक प्रदेश काँग्रेसने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसने यापूर्वीच दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या असून, एकूण 166 मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित 58 मतदारसंघात मात्र उमेदवार निश्चित करताना काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.

याबाबत बोलताना काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद म्हणाले की, भाजपचे तिकीट जाहीर केल्यानंतर आम्ही काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करू. भाजपमधून काही लोक आमच्याकडे आले असल्याचा गौप्यस्फोट हरिप्रसाद यांनी केला आहे.

Tags: