Belagavi

भाजपकडून डावपेच खेळत अभिनेता सुदीपचा गैरवापर : सतीश जारकीहोळी

Share

निवडणूक प्रचारासाठी अभिनेता सुदीपचा वापर करणे हा भाजपचा डाव आहे. त्यानुसार भाजप सुदीपचं गैरपवर करत असून, त्यामुळे सुदीपचेच नुकसान होणार आहे अशी प्रतिक्रिया केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी दिली.

गोकाक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, निवडणुकीत मते मिळवण्यासाठी भाजप रोज नवनवे तंत्र वापरतो. अभिनेता सुदीपकडून भाजपचा प्रचार करविणे हे त्यापैकीच एक तंत्र आहे. पण मोठी संदिग्धता आहे. सुदीप राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही, मुख्यमंत्री बोम्मई यांचा प्रचार करणार असल्याचे म्हणतो तर बोम्मई आम्ही सांगू त्या उमेदवारांनाच प्रचार करेल असे म्हणतात. दोन्ही बाजूनी संभ्रम कायम आहे. उद्या सुदीपला मुख्यमंत्री करू असे म्हणत भाजपने मतांचा जोगवा मागितला तर आश्चर्य वाटायला नको. गेल्यावेळी त्यांनी बी. श्रीरामुलू यांना उपमुख्यमंत्री करतो म्हणून आपल्याकडे ओढून त्यांच्या समाजाची मते मिळवली. परंतु शेवटपर्यंत काही त्यांना उपमुख्यमंत्री केले नाही. नुसतेच चॉकलेट दाखवले. या सगळ्या घडामोडीत अभिनेता सुदीप याचेच मोठे नुकसान होणार आहे. कारण त्यांचे चाहते सर्व पक्षांत आहेत. ते सुदीपच्या भूमिकेमुळे डिस्टर्ब, नाराज होतील असे जारकीहोळी म्हणाले.

काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक नाराज झाल्याच्या प्रश्नावर बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, उमेदवारी मिळावी अशी अनेक कार्यकर्त्यांना इच्छा असते. परंतु पक्ष स्थानिक नेते, लोकांचा अभिप्राय, पक्षासाठी केलेले काम आदी निकषांच्या आधारावर उमेदवारी देतो. काही बाबतीत चुकून अन्याय होऊ शकतो. परंतु पक्षाचा आदेश अंतिम असतो. त्यामुळे समजून घेऊन पक्षाच्या विजयासाठी वाहून घेतले पाहिजे. काँग्रेस नेते असंतुष्टांची नाराजी दूर करतील. अजून खूप कामे आहेत. पक्षाचा प्रचार, उमेदवारी अर्ज भरणे, लोकसंपर्क करावयाचा आहे असे ते म्हणाले. राज्यात काँग्रेसची बाजू भक्कम आहे.

लोक आमच्या बाजूने आहेत, विकासकामे आणि राज्य व केंद्र सरकारचे अपयश, महागाई, दरवाढ आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ. आम्ही केवळ राजकारण करत नाही. समाजसेवा करून लोकांच्या सतत संपर्कात राहून त्यांचे दुःख जाणून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित आहे असा दावा सतीश जारकीहोळी यांनी यावेळी केला.

एकंदर, भाजपचा प्रचार केल्याने अभिनेता सुदीप याचे वैयक्तिक नुकसान होणार असल्याचा दावा सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.

Tags: