बेळगाव उत्तर मध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता तर सर्वाना आहेच पण त्याहून अधिक , उमेदवार निवडीची डोकेदुखी बनली आहे . दिल्लीला पाठवलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीतुन कोणाचे नाव सिलेक्ट होऊन येते याची सर्वाना उत्कंठा लागून राहिली आहे .
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची भाजपची पहिली उमेदवार यादी ७ एप्रिलला जाहीर होणार आहे . बेळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर राज्य कोअर कमिटीकडून प्रत्येक मतदारसंघातून तीन प्रबळ इच्छुक उमेदवारांची नावे दिल्लीला निवड समितीकडे पाठवण्यात आली आहेत . गुरुवारी म्हणजे उद्याच उमेदवाराचे नाव अंतिम होऊन येणार आहे .
बेळगाव उत्तर मधून , बेळगावचे विद्यमान आमदार अनिल बेनके , लिंगायत समाजाचे मुरगेन्द्रगौडा पाटील तसेच बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर या तिघांची नावे दिल्ली दरबारी पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे . मात्र बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या उमेदवार निवडीचा एक पेच निर्माण झाला आहे . लिंगायत समाजाच्या मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात मुरगेन्द्रगौडा पाटील याना जर उमेदवारी देण्यात आली तर अनिल बेनकेना कुठल्या मतदारसंघाची उमेदवारी देणार ? आ . अनिल बेनके याना , ग्रामीण भागातून भाजपाची उमेदवारी देतील अशी चर्चा सध्या बेळगावच्या वर्तुळात सुरु आहे . शिवाय लिंगायत समाजाचे डॉ . रवी पाटील हे देखील बेळगाव उत्तर मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत .
आता उद्या दिल्लीच्या बैठकीत कोणत्या उमेदवाराचे नाव निश्चित होणार याचे अंदाज बांधण्यात येत आहेत .
एकंदर , बेळगाव उत्तर मतदारसंघात दोन मराठा आणि दोन लिंगायत उमेदवारांपैकी भाजपचे तिकीट कोणाला मिळणार या चर्चेला , दिल्लीतून येणाऱ्या , अंतिम उमेदवार यादीनंतरच पूर्णविराम मिळणार आहे


Recent Comments