निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात आजअखेर मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येणारी आमिषे, पैसे दारू आदी एकूण 9 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिली.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश पाटील यांनी सांगितले की, काल मंगळवारी एकाच दिवसात हिरेबागेवाडी टोल नाक्यावर एका खासगी बसमधून नेण्यात येत असलेली 2 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम आणि अन्य कारवायांत 73 लाख अशी एकूण 2 कोटी 73 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. नागरी पोलिसांसह भरारी पथके व अन्य पथके स्थापन केली असून ती पोलीस आयुक्त आणि एसपींच्या नेतृत्वाखाली दक्षतेने कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व 18 मतदार संघात मिळून एकूण 62 चेक पोस्ट्स उभारण्यात आली आहेत. त्यापैकी 24 आंतरराज्य तपासणी नाके आहेत. सर्व चेक पोस्ट्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तेथील कव्हरेज जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर आणि एसपी ऑफिसमध्ये पाहता येण्याची व्यवस्था केली आहे. या तिन्ही कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सर्व चेक पोस्ट्सवर आमचे पोलीस व अन्य कर्मचारी 24X7 सतत 3 शिफ्ट्समध्ये काम करत आहेत असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात उभारलेल्या सर्व 62 चेक पोस्ट्सवर सध्या पोलीस, महसूल आदी खात्यांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही यात सहभागी करून फॉरेस्ट चेक पोस्ट्सवरही तपासणी कार्य सुरु करण्यात येणार आहे असे सांगून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, चेक पोस्ट्सवरून होणाऱ्या जप्ती आदी कारवाया, अन्यत्र जप्त केले जाणारे पैसे, दारू, आमिषे आदी सगळ्या कारवायांचा सविस्तर तपशील रोज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निवडणूक आयोगाला रोजच्यारोज कळविण्यात येतो. सर्व राजकीय पक्षदेखील आपापले सभा-समारंभ पूर्व परवानगी घेऊनच आयोजित करत आहेत. निवडणूक निरीक्षक त्याठिकाणी जाऊन खर्चाचा सविस्तर तपशील नोंदवून घेत आहेत. हा तपशील देखील निवडणूक आयोगाला रोज कळविण्यात येत आहे असे ते म्हणाले.
एकंदर, निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेची बेळगाव जिल्ह्यात कडक अमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी सांगितले.


Recent Comments