देवाने कितीही चांगले रंग-रूप दिले तरी त्याला नाव ठेवत काहीही न करता कुढत राहणारे अनेक महाभाग समाजात आहेत. परंतु शारीरिक आव्हानांवर मत करत देवाने दिलेल्या जीवनाचे सोने करणारेही दिव्यांग आपण पाहतो तेंव्हा थक्क व्हायला होते. बेळगावची कन्या शरण्या कुंबार ही त्यापैकीच एक. पहिल्या डाऊन सिंड्रोम राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत बेळगावचा तिने डंका वाजवलाय.
सिकंदराबाद येथे पार पडलेल्या पहिल्या डाऊन सिंड्रोम राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत शरण्या कुंबार हिने जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. शरण्या कुंबार हिने सिकंदराबाद येथे पार पडलेल्या पहिल्या डाऊन सिंड्रोम राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत जलतरण स्पर्धेत 2 सुवर्णपदके मिळवली आहेत. तिने 25 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण प्रकारात प्रत्येकी एक अशी एकूण 2 सुवर्णपदके मिळवली आहेत. या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शरण्याचा जन्म 2008मध्ये झाला. ती विशेष मुलांच्या गटवारीत येते. त्यामुळे तिचे वडील शशिकांत आणि आई संतोषकला कुंबार यांनी तिची विशेष काळजी घेत वाढविले. या दांपत्याने तिचा कल पाहून तिला जलतरणाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेऊन अमलात आणला. शरण्या बेळगाव तालुक्यातील अगसगे येथील लीलावती करगुप्पीकर माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकतेय. जलतरणाचे प्रारंभीचे प्रशिक्षण तिने बेळगाव स्वीमर्स क्लब आणि एकवर्स क्लब येथे घेतले आणि काही दिवसांतच जलतरणातील आपले प्राविण्य दाखवून सर्वाना थक्क केले. आजवर विविध ठिकाणी झालेल्या राज्य आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धांत तिने 13 सुवर्णपदके जिंकून यशाला गवसणी घातली आहे.
शरण्याने 6 मार्च 2022 रोजी बेंगळूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण, 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्ण तर 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. 24 ते 27 मार्च 2022 या काळात राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या 21व्या नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पिअनशिपमध्ये तिने 200 मीटर फ्री स्टाईल आणि 100 मीटर बॅक स्ट्रोक या दोन्ही प्रकारात सुवर्णपदके पटकावलीत.
15 ऑक्टोबर 2022 रोजी बेंगळूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पिअनशिपमध्ये शरण्या कुंबारने 200 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर फ्री स्टाईल आणि 100 मीटर बॅक स्ट्रोक या तिन्ही प्रकारात सुवर्णपदके पटकावली. 13 नोव्हेंबर 2022 रोजी आसामची राजधानी गुवाहाटी येथे झालेल्या 22व्या दिव्यांगांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत शरण्याने 200 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर फ्री स्टाईल आणि 100 मीटर बॅक स्ट्रोक या तिन्ही प्रकारात सुवर्णपदके पटकावली.
जलतरण तलावातील स्पर्धांसोबतच खुला समुद्रात पोहतानाही शरण्याने आपली चमक दाखवून दिली आहे. महाराष्ट्रातील मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे 17 व 18 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या राज्यस्तरीय डिस्टन्स कॅटेगरी ओपन सी स्विमिंग अर्थात खुल्या समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत 1 किमी अंतर विक्रमी वेळेत कापून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
याशिवाय गुजरातमधील पोरबंदर येथे 7 व 8 जानेवारी 2023 दरम्यान झालेल्या ऑल इंडिया डिस्टन्स कॅटेगरी ओपन सी स्विमिंग स्पर्धेत तिने 1 किमी अंतर विक्रमी वेळेत कापून सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. लहान वयात विविध स्पर्धांत 13 सुवर्णपदके पटकावण्याची विक्रमी कामगिरी करणारी शरण्या कुंबार सध्या केएलई संस्थेच्या ऑलिंपिक दर्जाच्या सुवर्ण स्विमिंग पूलमध्ये जलतरणाचा नियमित सर्व करत आहे. तिच्या या वाटचालीत तिचे वडील शशिकांत आणि आई संतोषकला यांच्याप्रमाणेच प्रशिक्षक उमेश कलघटगी यांचे कष्ट, मार्गदर्शन आणि प्रेरणा यांचा मोठा वाटा आहे. शारीरिक व्यंगावर मात करून लहान वयात अचंबित करणारी कामगिरी करणाऱ्या जलकन्या शरण्या कुंबारला आमचा सलाम !


Recent Comments