आमचा पक्ष लोकशाही मूल्ये जपणारा पक्ष आहे. त्यामुळे त्याआधारेच उमेदवारांची निवड केली जाते. कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन उमेदवार निश्चित केले जाईल, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
उमेदवार निवडीबाबत शुक्रवारी शहरातील धर्मनाथ भवन येथे झालेल्या बैठकीत बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले की, आमचा पक्ष काँग्रेससारखा कौटुंबिक, घराणेशाहीचा पक्ष नाही. काँग्रेस पक्ष हा खोटी आश्वासने देण्यात माहीर असलेला पक्ष आहे. त्यांचे नेते गॅस सिलिंडरसाठी महिलांना पैसे देतो, मुलींना पैसे देतो, म्हणतात. त्यांच्या काळात किती गॅस दरवाढ झाली असा सवाल त्यांनी केला. एका कुटुंबाला वर्षाला ७८ हजार देऊ, गॅरंटीकार्ड देऊ, असे सांगतात, पण ते जे सांगतात ते कधीच करत नाहीत. राजस्थानमध्ये त्यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नसल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसचं गॅरंटी कार्ड काम करेल की नाही हे माहित नाही पण या निवडणुकीत काँग्रेस घरी जाईल याची गॅरंटी आहे असा टोला त्यांनी हाणला.

देशात आणि राज्यात भाजपने जनतेला सुशासन दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली जगात आज भारताला मनाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्याशिवाय आपली अर्थव्यवस्थाही गतिमान झाली आहे. राह्यठी भाजप सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबवून जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. येत्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीतही लोकशाही आधारित पद्धतीने निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळेच पक्ष पदाधिकारी, तळागाळातील बूथ पातळीवरचे पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा व राज्य कोअर कमिटी आणि राज्यस्तरीय निवडणूक समितीच्या पातळीवर उमेदवारांविषयीचे अभिप्राय जाणून घेऊन अंतिम उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके यांच्यासह भाजपच्या विविध शाखांचे अनेक पदाधिकारी व नेते उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांकडून नमुन्यातील अभिप्राय संग्रह फॉर्मवर कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत अभिप्राय नोंदवून घेण्यात आले.


Recent Comments