Belagavi

विधानसभा निवडणुकीत भाजपला द्या समर्थन : डॉ. एम. जी. मुळे

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील बोम्मई सरकारने शेतकरी, कष्टकरी आणि मराठा समाजासह सर्व वर्गाच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला समर्थन देण्याचे आवाहन कर्नाटक राज्य मराठा समाज सुधारणा निगमचे अध्यक्ष डॉ. मारुतीराव जी. मुळे यांनी केले.

बेळगाव ग्रामीण विधान सभा क्षेत्रातील बेळगुंदी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त कर्नाटक मराठा समाज सुधारणा निगमचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांचा जाहीर सत्कार व सभा असा संयुक्त कार्यक्रम भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी डॉ. मुळे बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. मुळे म्हणाले, भाजप सरकारने कर्नाटकातील मराठा समाजाला भरपूर काही दिले आहे. मराठा समाजासाठी स्वतंत्र निगम मंडळ स्थापून 100 कोटी रुपये मराठा सामन्याच्या हितासाठी खर्च करत आहे. तसेच उदुगिरी येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी 5 कोटी रुपये मंजूर करून कर्नाटकातील मराठा समाजाला सन्मानित केले आहे असे ते म्हणाले.

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी यावेळी बोलताना ग्रामीण विधानसभा जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी येकत्र येऊन संघटित कार्य केले पाहिजे. ग्रामीणच्या भ्रष्ट आमदारांना हरवुन घरी पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, ग्रामीण आमदारांनी जनतेची लुटालूट चालविली आहे. गरीब जनतेचा ऊस घेऊन जाऊन वजन काट्या मध्ये 20% घपला करून शेतकर्‍यांना लुटून आपली तिजोरी भरल्याचा आरोप त्यांनी केला.

व्यासपिठावर बेळगाव ग्रामीण प्रभारी रमेश देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, बेळगुंदी ग्राम पंचायत अध्यक्षा सौ हेमा सुभाष हदगल, सर्व महाशक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज घाडी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी केले.

Tags: