Belagavi

मेणसी गल्लीतील 2 नॉव्हेल्टी दुकानांना आग; सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान

Share

बेळगावातील मेणसी गल्लीतील 2 नॉव्हेल्टी दुकानांना लागलेल्या आगीत सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या मेणसी गल्लीत कॉस्मेटिक, डेकोरेशन साहित्य, नॉव्हेल्टीची दुकाने आहेत. त्यापैकी दर्शन नॉव्हेल्टी या सजावटीच्या साहित्याच्या आई त्याशेजारील उत्तम नॉव्हेल्टी या मेटेह ज्वेलरीच्या दुकानाला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. दुकानात ज्वलनशील साहित्य अधिक असल्याने काही क्षणातच आगीने पेट घेतला. पाहता-पाहता दोन्ही दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गल्लीतील काही नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यावर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले.

 

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना दर्शन नॉव्हेल्टीचे मालक टिनूभाई शाह यांनी सांगितले की, आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. यात सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोणीतरी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अवघ्या दहा मिनिटातच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. दोन बंब पाणी वापरून आगीवर नियंत्रण आणले. त्यांनी वेळेवर पोहोचून आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. थोडा जरी उशीर झाला असता तर गल्लीतील अन्य दुकानात ही आग पसरून मोठा अनर्थ घडला असता असे सांगून सरकारने आम्हाला योग्य ती भरपाई वेळेवर द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

उत्तम नॉव्हेल्टीचे मालक मणिपालसिंह यांनी सांगितले की, त्यांच्या दुकानात इमिटेशन ज्वेलरीचे महागडे साहित्य मोठ्या प्रमाणात होते. शॉर्टसर्किटने आग लागून सर्व साहित्य भस्मसात झाले आहे. त्यामुळे आमचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 


दरम्यान, मेणसी गल्लीतील रहिवाशांनीही आग विझविण्याच्या कामात हातभार लावला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात शॉर्टसर्किटने आग लागून नुकसान होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्या टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

 

Tags: