लायन्स क्लब ऑफ बेळगावतर्फे माहेश्वरी अंध शाळेत मोफत कृत्रिम अवयव रोपण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे 90 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात आले.
समाजसेवेच्या क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ बेळगावतर्फे आज शहरातील नेहरुनगरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेत मोफत कृत्रिम अवयव रोपण शिबीर घेण्यात आले. यासाठी हुबळी येथील अखिल भारतीय जैन युवक संघटनेच्या महावीर लिंब सेंटरचे सहयोग लाभले. या शिबिरात सुमारे 90 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात आले.

जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून आलेल्या पाय गमावलेल्या दिव्यांगांना कृत्रिम पाय बसविण्यासाठी पायांचे मोजमाप घेण्यात आले.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना लायन्स क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रवींद्र काकती यांनी सांगितले की, लायन्स क्लबतर्फे नेहमीच विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येतात. क्लबच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कृत्रिम अवयव रोपण शिबिराचे आयोजन आज बेळगावात केले आहे. यात दिव्यांगांना कृत्रिम जयपूर फूट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी 90 दिव्यांगांनी नोंदणी केली असून, त्यांच्या पायांचे मोजमाप घेऊन पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कृत्रिम पाय तयार झाल्यावर त्यांना बोलावून फिटिंग करून चाचणी घेऊन कृत्रिम पाय बसविण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
शिबिराच्या उदघाटनाला माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीनिवास शिवणगी, एमजेएफ मोनिका सावंत, क्लबचे सचिव श्रीधर उप्पीन, इव्हेंट चेअरमन उदय वाडवी तसेच हुबळीच्या महावीर लिंब सेंटरचे तंत्रज्ञ उपस्थित होते.


Recent Comments