Belagavi

अभिनेता डॉली धनंजयची कुंदानगरी बेळगावला भेट

Share

येत्या 30 मार्च रोजी रिलीज होणाऱ्या ‘होयसळ’ सिनेमाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता डॉली धनंजयने कुंदानगरी बेळगावला भेट दिली. यावेळी चाहत्यांनी त्याचे भरभरून स्वागत केले.

बेळगावातील राय चन्नम्मा चौकात डॉली धनंजयची एंट्री होताच चाहते ‘डॉली डॉली’ असा जयघोष करत फिरू लागले. यावेळी डॉली धनंजय यांनी शहरातील चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉलीसह सेल्फी घेण्यासाठी उच्चांकी गर्दी केली.

त्यानंतर डॉली धनंजय यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ‘होयसळ’ या चित्रपटाचे चित्रीकरण बेळगावच्या आसपासच्या भागात झाले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मी बेळगावला भेट देण्यासाठी आलो आहे. ‘होयसळ’ सिनेमा ही बेळगाव आणि अथणीच्या काही भागात बेतलेली कथा आहे. बेळगाव, संकेश्वर आणि अथणी येथे आम्ही दीड महिना ‘होयसाळ’ चित्रपटाचे शूटिंग केले आहे.

आज मी नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीला भेट देऊन नमस्कार करणार आहे. नंतर संध्याकाळी मी बैलहोंगल येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. शूटिंगदरम्यान बेळगावच्या लोकांनी भरभरून प्रेम दाखवलं आहे. या भागातील लोक कलाकारांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यामागे एक महान शक्ती म्हणून उभे आहेत असे सांगून कृपया तुमच्या कुटुंबासह ‘होयसळ’ चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जा आणि त्याचा आनंद लुटा असे
अभिनेता डॉली धनंजयने चाहत्यांना आवाहन केले.

यावेळी चन्नम्मा चौकात डॉली धनंजयला पाहण्यासाठी कन्नड चित्रपट रसिकांनी गर्दी केली होती.

Tags: