Belagavi

बेळगावकरांनो उन्हाळ्यात पाणी जपून वापरा : महापौर-उपमहापौरांचे आवाहन

Share

बेळगावचा महत्वाचा जलश्रोत असलेल्या राकसकोप जलाशयात सध्या केवळ आणखी ७० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे बेळगावकरांनो उन्हाळ्यात पाणी जपून वापरा असे आवाहन महापौर-उपमहापौरांनी केले आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन तेथील पाणी साठ्याचा आढावा घेतला. जलाशयात उपलब्ध पाणीसाठा आणि गेल्यावर्षीच्या पाणीपातळी याचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी संबंधित अभियंत्याशी चर्चा करून माहिती घेतली.

यावेळी राकसकोप धरणावर नियुक्त सहायक अभियंता मंजुनाथ यांनी महापौर-उपमहापौरांना माहिती देताना सांगितले की, गेल्यावर्षी याच काळात धरणातील पाण्याची पातळी 2465 फूट होती. ती यंदा 2461 फूट आहे. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत 4 फुटांनी पाणीपातळी कमी आहे. हा साठा पाहता बेळगाव शहराला आणखी केवळ 70 दिवसच पाणी पुरवता येईल. त्याच्या आत वळवाचा पाऊस झाल्यास साठ्यात वाढ होऊ शकेल.


दरम्यान, राकसकोप जलाशयात बेळगाव शहराला केवळ 70 दिवसच पाणी पुरवता येईल इतकाच साठा असल्याने बेळगावच्या नागरिकांनी या उन्हाळ्यात पाणी जपून वापरावे असे आवाहन महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी केले आहे.

या भेटीवेळी कर्नाटक पाणी पुरवठा मंडळ आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: