कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन (KDEM) ने आपल्या औद्योगिक भागीदारांसह बेळगावला ड्रोन आणि इलेक्ट्रिक व्हेइकल हब बनवण्याच्या उद्देशाने औद्योगिक क्लस्टरला प्रोत्साहन देण्यासाठी DroEV-2023 क्लस्टरची स्थापना केली आहे.
ईव्ही ड्रोन क्लस्टरच्या उद्घाटनाच्या दिवशी उद्योगांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सुमारे 16 व्यावसायिकांनी क्लस्टरमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले आहे. ज्यातून 10,000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

नवीन ड्रोन ईव्ही उपक्रमाचा उद्देश स्थानिक उद्योग आणि भागीदारांना जागतिक पुरवठा नेटवर्कचा भाग बनवणे आणि या क्षेत्रांमध्ये जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे आहे. ड्रोन ईव्ही क्लस्टर ड्रोन आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगाची स्थापना करताना स्थानिक प्रतिभा, बुद्धिमत्ता, उत्पादने आणि नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यात मदत करेल. बेळगावातील मयूर प्रेसिडेन्सी क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमात आयटीबीटी, कौशल्य विकास मंत्री अश्वत्थ नारायण व अन्य मान्यवरांच्या हस्ते व्हर्च्युअली ड्रोन-ईव्ही क्लस्टरचे उदघाटन करण्यात आले.
याबाबत बोलताना केडीईएमचे अध्यक्ष बी. व्ही. नायडू म्हणाले, “सर्व क्षेत्रांमध्ये अनुकूल उत्पादन परिसंस्था सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जागतिक पुरवठा साखळी आणखी सुधारण्यासाठी स्थानिक उद्योगांना, भागीदारांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आणि या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्याच्या उद्देशाने ड्रोन ईव्ही क्लस्टर सुरू केले जात आहे. या दृष्टीने बेळगाव इंडस्ट्री हब, संशोधन आणि विकास केंद्रे, शैक्षणिक संस्थांसह हे प्रमुख स्थान आहे. आणि हे क्लस्टर जागतिक नेटवर्क वाढवण्यासाठी एक इकोसिस्टम प्रदान करेल,” असे ते म्हणाले.

“देशात स्थानिक प्रतिभेची कमतरता नाही. दरवर्षी ३०,००० अभियांत्रिकी आणि आयआयटी विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. हे क्लस्टर स्थापन करण्याचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश ड्रोन आणि ईव्ही उत्पादन क्षेत्रात अशा स्थानिक प्रतिभांना संधी उपलब्ध करून देणे आहे, जे भविष्यात महत्त्वाचे ठरेल, असे ते म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक्स, आयटी-बीटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ईव्ही रमण रेड्डी म्हणाले, “बेळगावमध्ये उद्योग आधीच वाढत आहेत. हुबळी-धारवाड, बेळगाव औद्योगिक क्लस्टर्स बियाँड बेंगलोर संकल्पना साकार करण्यास मदत करत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आयटी-बीटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग केडीईएमच्या सहाय्याने या विभागातील प्रतिभा आणि कुशल कामगारांसाठी स्थानिक पातळीवर अधिक संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने ड्रोन आणि ईव्ही क्लस्टरची स्थापना करत आहे. ते देशाच्या डिजिटायझेशनला हातभार लावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केडीईएमचे सीईओ संजीव गुप्ता म्हणाले, “बेळगावने उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक स्टार्टअपसाठी उत्कृष्ट परिसंस्था प्रदान केली आहे. या पार्श्वभूमीवर ड्रोन ईव्ही क्लस्टर स्थापित केले जात आहे. पुढील पाच वर्षांत भारतीय ड्रोन बाजारपेठ वार्षिक 10टक्के दराने वाढेल आणि ईव्ही बाजारपेठेत 50 टक्के वाढ अपेक्षित आहे आणि या वाढीमध्ये कर्नाटक महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यासाठी KEDM नवीन क्लस्टर तयार करून या वाढीला आणखी गती देणार आहे. याशिवाय, DroEV 2023 बेळगावमधील विद्यमान औद्योगिक क्लस्टर्सच्या वाढीसही पूरक ठरेल,” असे ते म्हणाले.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगावचे उद्योजक चैतन्य कुलकर्णी म्हणाले की, कर्नाटक डिजिटल इकॉनॉमिक मिशनने बेळगावात ड्रोन-ईव्ही क्लस्टर स्थापन करून चांगला निर्णय घेतला आहे. बेळगावात यासाठी अतिशय पूरक वातावरण आहे. यामुळे येथे रोजगार निर्मिती तर होईलच पण नवीन आविष्कार घडतील. त्यामुळे बेळगावचाही लौकिक वाढेल. आज येथे सेमिनारचे आयोजन केले असून १६० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
व्हीटीयूचे माजी कार्यकारी संचालक आनंद हावण्णावर यांनी, बेळगाव स्टार्ट अपसाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. १९६२ च्या सुमारास येथे बेमको हैड्रॉलिक्सची स्थापना झाली होती. त्यानंतर हैड्रॉलिक्स उद्योगांची येथे वाढ झाली. ड्रोन आणि ईव्ही क्लस्टरमुळे येथे पूरक उद्योगांचीही वाढ होईल, त्याशिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असे सांगून आनंद व्यक्त केला.
एकदिवसीय कार्यक्रमाला 200 हून अधिक उद्योजक, धोरणकर्ते, संशोधन आणि विकास क्षेत्रातील अग्रणी आणि स्टार्टअप्स उद्योजक उपस्थित होते. क्षेत्रातील तज्ञांनी केवळ त्यांचे अनुभवच सांगितले नाहीत तर बेळगावमध्ये DroEV क्लस्टरच्या स्थापनेचे कौतुक केले.
या कार्यक्रमात ईव्ही उद्योगातील नेते, ईव्ही स्पेअर पार्ट्स उत्पादक, बॅटरी उत्पादक, चार्जिंग उपकरणे आणि पायाभूत सुविधा पुरवठादार, ऑटोमोबाईल घटक उत्पादक, यूएव्ही, एरोस्पेस घटक उत्पादक, दूरस्थ पायलट प्रशिक्षण संस्था, प्रमाणित ड्रोन पायलट उपस्थित होते.


Recent Comments