भाजप नेते सी. टी. रवी यांनी लिंगायत समाजाबद्दल केलेले वक्तव्य मागे घेऊन लिंगायतांची माफी मागावी अन्यथा, त्यांना व त्यांच्या पक्षाला लिंगायत समाज धडा शिकवेल असा इशारा जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी दिला.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना बसवराज रोट्टी म्हणाले की, जागतिक लिंगायत महासभा ही लिंगायत समाजाची एक प्रातिनिधिक संघटना आहे. लिंगायतांचे रक्षण आणि स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता मिळवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नुकतेच भाजप आमदार सी. टी. रवी यांनी लिंगायत समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. वृत्तपत्रातूनही याबाबत बातम्या आल्या आहेत.
“लिंगायतांना दूर ठेवा, आम्हाला त्यांची मते नकोत” अशा अर्थाचे हे वक्तव्य आहे. याचा मी निषेध करतो. लिंगायत हा कर्नाटकातील एक प्रमुख समाज आहे. त्यांच्या पाठिंब्यानेच राजकीय पक्षांनी यापूर्वी सत्तेची चव चाखली आहे. ज्या राजकीय पक्षांनी लिंगायतांची अवहेलना केली ते सत्तेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे आम्हाला हलक्यावर घेऊ नका, हे मी रवी याना सांगू इच्छितो. या वक्तव्याबद्दल आ. रवी यांनी समस्त लिंगायत समाजाची माफी मागून ते मागे घ्यावे. अन्यथा संपूर्ण लिंगायत समाज त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
भाजपच्या केवळ येडियुरप्पा यांनीच या वक्तव्याचा निषेध करून अशी वक्तव्ये करू नयेत असा सल्ला दिला आहे. ते सोडून इतर कोणीही भाजप नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केलेला नाही. उलट त्याच्या समर्थनार्थ वक्तव्ये केली आहेत हे दुर्दैवी आहे. कर्नाटकात अनेक मतदार संघात लिंगायत समाजाची लोकसंख्या अधिक आहे. अनेक मतदारसंघात आम्ही निर्णायक आहोत. त्यामुळे लिंगायतांचा अवमान केल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू असा इशारा बसवराज रोट्टी यांनी दिला.
एकंदर, भाजपचे वाचाळवीर म्हणून ओळखले जाणारे आ. सी. टी. रवी यांनी लिंगायत समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य करून स्वतःवर आणि पक्षावरही नवे वादळ ओढवून घेतले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


Recent Comments