Belagavi

राहुल गांधी बेळगावात उद्या करणार युवकांसाठी गॅरंटीकार्डचे अनावरण

Share

बेळगावात उद्या होणारा काँग्रेसचा युवा क्रांती मेळावा कर्नाटकातील आणि देशातील युवकांच्या जीवनात आशेची नवी मशाल प्रज्वलित करणारा ठरेल. या मेळाव्यात राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याहस्ते राज्यातील युवकांसाठी गॅरंटीकार्डचे अनावरण करण्यात येईल अशी माहिती पक्षाचे राज्य प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिली.

बेळगावात सीपीएड मैदानावर उद्या होणाऱ्या काँग्रेसच्या युवा क्रांती मेळाव्याच्या अंतिम टप्प्यातील तयारीची रणदीपसिंह सुरजेवाला यांनी आज पाहणी करून विविध सूचना संबंधितांना केल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजप सरकारने राज्यातील युवकांचे भविष्य अंधःकारात लोटून दिले हे कटू सत्य आहे. येथील युवक-युवतींमध्ये गुण, कौशल्य, इच्छा, शिक्षण, पुढे जाण्याची क्षमता सर्व काही आहे.

मात्र भाजपच्या 40% कमिशनच्या भ्रष्ट सरकारने त्यांच्या भविष्याला ग्रहण लावले आहे. त्यामुळे राज्यातील आणि देशातील युवकांचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी उद्याच्या युवा क्रांती रॅलीत काँग्रेस एक नवे धोरण निश्चित करेल. राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याहस्ते युवा गॅरंटी कार्डचे अनावरण करण्यात येईल. हे गॅरंटी कार्ड युवकांच्या जीवनात एक आमूलाग्र बदल घडवून आणेल. जनतेच्या आशीर्वादाने पुढील 2 महिन्यात कर्नाटकात सत्तेवर येणार असलेले काँग्रेसचे सरकार युवा वर्गासाठी काय करणार याचे अभिवचन त्यात देण्यात येईल. देशातील प्रांतीय सरकारे आणि केंद्रातील मोदी सरकारला त्याची दखल घेणे भाग पडेल असा दावा सुरजेवाला यांनी यावेळी केला.

केंद्रातील भाजप सरकारने देशातील जनतेची तसेच युवावर्गाची फसवणूक केल्याचा आरोप करून सुरजेवाला म्हणाले, 8 वर्षांपूर्वी सत्तेत आल्यावर मोदींनी देशातील युवकांसाठी दरवर्षी 2 कोटी नवे रोजगार निर्माण करण्याचा शब्द दिला होता. या हिशेबाने आजवर 16 कोटी रोजगार निर्माण व्हायला हवे होते. परंतु खेदाची बाब ही की, तब्बल 27 कोटी रोजगार बुडाले आहेत. देशात बेरोजगारीचा दर 8% वर गेला आहे. भाजपच्या धोरणामुळे कर्नाटकात खासगी संस्थात्मक आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ मंदावला आहे. हिंदू-मुस्लिम, वक्कलिग-लिंगायत, दलित-मागास अशी भांडणे लावल्याने समाजात शांती कशी नांदेल.

शांती नसेल तर उद्योग-व्यवसाय कसे येतील?, आणि ते आले नाहीत तर रोजगार कसे निर्माण होणार असा सवाल सुरजेवाला यांनी केला. मुख्यमंत्री बोम्मई आता मोदींप्रमाणे खोटे बोलण्यास शिकले असल्याचा आरोप करून ते म्हणाले, अँपलचा फॉक्सकॉन प्रकल्प कर्नाटकात येत असल्याचे बोम्मई यांनी खोटेच सांगितले. त्याच्या 48 तासांतच या कंपनीनेच असा कोणताही प्रस्ताव आम्ही कर्नाटक सरकारला दिलेला नाही असे निवेदन जारी केले. काही दिवसांतच हा प्रकल्प तेलंगणात गेला. कॅब सेवा देणारी प्रमुख कंपनी ओलानेही आपला प्रकल्प तेलंगणात नेला. ही बोम्मईंच्या खोटेपणाची लक्षणे आहेत असे ते म्हणाले. पीएसआय, सहाय्यक प्राध्यापक अशा सरकारी नोकऱ्यांचा तर कर्नाटकात लिलावच सुरू आहे अशा शब्दांत सुरजेवाला यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले.

उद्याच्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने युवक येतीलच, पण अन्य वयोगटातील लोकांनाही या मेळाव्याला आमंत्रित केले असून हा मेळावा अत्यंत यशस्वी होईल असा दावा रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केला.

Tags: