बेळगावात येत्या 20 मार्च रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या युवा क्रांती मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मेळाव्याला राज्यभरातून सुमारे 2 लाख युवक, कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा असल्याची माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगावातील क्लब रोडवरील सीपीएड कॉलेज मैदानावर येत्या 20 मार्च रोजी काँग्रेसचा युवा क्रांती मेळावा होणार असून, त्याला राहुल गांधी संबोधित करणार आहेत. त्याच्या पूर्वतयारीची पाहणी केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी आज सीपीएड मैदानाला भेट देऊन केली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेनंतर देशात प्रथमच बेळगावात राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. बेळगावातून संपूर्ण राज्याला एक नवा संदेश राहुल गांधी देणार असल्याने ही एक ऐतिहासिक सभा ठरेल. संपूर्ण राज्यभरातून सुमारे 2 लाख युवक, कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा रोड शो होणार नाही. त्यासाठी परवानगी मागितली आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही, ती दिल्यावर पाहू. त्याचप्रमाणे जाहीर सभेच्या दरम्यान, राहुल गांधी यांचा युवकांशी संवाद कार्यक्रम होणार का या प्रश्नावर अद्याप राहुल गांधी यांचा दौऱ्याचा तपशील आलेला नाही. अजूनपर्यंत तरी संवाद कार्यक्रम ठरलेला नाही असे ते म्हणाले.
काँग्रेसची उमेदवार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. 108-110 नावे निश्चित केली आहेत. त्यासाठी पूर्वतयारी वेगात सुरु आहे. गुढीपाडव्याला पहिली उमेदवार यादी घोषित करण्यात येईल. सहा विद्यमान आमदारांना उमेदवारी न देण्यावर चर्चा सुरु आहे. ती नावे कोणाची हे अजून समजलेले नाही असे ते म्हणाले. सिद्दरामय्या यांनी कोलारमधून अथवा अन्यत्र निवडणूक लढवावी याचा निर्णय ते घेतील. हायकमांडवरच्या अंतिम निर्णयावरही ते अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. ‘राहुल गांधी आले म्हणून काही फरक पडणार नाही, काँग्रेसला फायदा होणार नाही’ मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, राजकारणात हे चक्र सुरु असतेच, मोदी आले म्हणून सर्व जागा भाजपला मिळाल्या असे कधीही झालेले नाही. मोदींनी प्रचार केलेल्या अनेक मतदारसंघात भाजपचा प्रभाव झाल्याची उदाहरणे आहेत असे आ. जारकीहोळी यांनी सांगितलं.
विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी, भाजप सत्तेत आल्यास राज्यातील मदरसे बंद करू असे विधान केले होते. त्यावर बोलताना निवडणूक आल्यामुळे ते तसे बोलतात. मदरसे पूर्वीपासून सुरु आहेत. ते कोणालाही बंद करता येणार नाहीत असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितलं. चिक्कोडीचे माजी खासदार रमेश कत्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करून निपाणीतून लढणार असल्याच्या प्रश्नावर, अद्याप तरी त्यांनी याबाबत आमच्याशी संपर्क केलेला नाही, याची आपणाला काही माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आ. सतीश जारकीहोळी यांनी सीपीएड मैदानावर सुरु असलेल्या राहुल गांधींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेऊन संबंधितांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments