Belagavi

“औरा-23” राष्ट्रीय युवा कल्चरल कार्निव्हलमध्ये तरुणाईची धूम !

Share

जिकडे पहावे तिकडे युवावर्गाचा जल्लोष, सळसळता उत्साहाने विविध कलांचे सादरीकरण आणि त्याला मिळणारा तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद असे चैतन्यमयी वातावरण बेळगावच्या जीआयटी कॉलेजमध्ये पहायला मिळाले. निमित्त होते, “औरा-23” राष्ट्रीय युवा कल्चरल कार्निव्हलचे !

होय, सळसळत्या उत्साहाने वावरणारी तरुणाई, संगीत-नृत्य, वक्तृत्व, फॅशन शो, नाट्य, अभिनय आदी कलांचे सादरीकरण आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याला मिळणार उत्स्फूर्त प्रतिसाद अशा भारलेल्या वातावरणात जीआयटी कॉलेजमध्ये आयोजित “औरा-23” राष्ट्रीय कार्निव्हल ऑफ कल्चरचा दुसरा दिवस पार पडला. नेहमी अभ्यास आणि अभ्यास यात गर्क असणाऱ्या विध्यार्थी-विद्यार्थिनींनी या निमित्ताने मनोरंजनाचा खजिना लुटला. देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून आलेल्या युवा स्पर्धकांनी यावेळी आपल्या कला-कौशल्याचे सादरीकरण करून उपस्थितांना भुरळ घातली.

यानिमित्त कलेचा आनंद लुटणाऱ्या विध्यार्थ्यानी विविध चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य, अभिनय सादर करून प्रसारमाध्यमांपुढे मन मोकळे केले. ‘भूलभुलैया’ या चित्रपटातील मंजुलिकाच्या भूमिकेत नृत्य सादर करणाऱ्या साक्षी जिरली या विद्यार्थिनीने औरा-२३च्या माध्यमातून मिळालेल्या कलेच्या सादरीकरणाच्या संधीबद्दल आनंद व्यक्त केला. या निमित्ताने रोजच्या अभ्यासाच्या धावपळीतून काही क्षण विरंगुळा मिळाल्याचे तिने सांगितले. तर प्रेरणा गेंजी या विद्यार्थिनीने या उपक्रमातून विध्यार्थ्यांना कला कौशल्य सादर करण्याची संधी दिल्याबद्दल प्राचार्य आणि संस्थेचे आभार मानले. महालिंगेश्वर या एमबीएच्या विद्यार्थ्याने देखील या जल्लोषी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून जीआयटीने विध्यार्थ्यांना आनंद लुटण्याची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

दरम्यान, औरामध्ये उद्या प्रसिद्ध नवोदित गायक बेनी द्याल यांची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केली आहे. एकंदर, औरा-२३च्या निमित्ताने जीआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलाय म्हटल्यास वावगे ठरू नये.

Tags: