Belagavi

जीआयटी सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक्सचे उद्या उदघाटन : राज बेळगावकर

Share

बेळगावातील विध्यार्थ्यांना अवकाश संशोधनाची संधी प्राप्त करून देण्यासाठी केएलएस संस्थेच्या गोगटे इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (जीआयटी) सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक्स सुरु करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन उद्या शनिवारी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन केएलएस संस्थेचे चेअरमन राज बेळगावकर यांनी सांगितले की, अभियांत्रिकीच्या सर्व क्षेत्रात विध्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण, प्रशिक्षण देण्यासह विविध कालसुसंगत अभ्यासक्रम, शैक्षणिक सुविधा देण्यावर जीआयटी भर देत आली आहे. आता जीआयटीसह अन्य शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनाही अवकाश संशोधन, एअरो स्पेस, ऍस्ट्रोफिजिक्स आदी विषयांचे प्रात्यक्षिकासह ज्ञान-अनुभव घेता यावा यासाठी सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक्स सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी बेंगळूरच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्सचे सहकार्य लाभले आहे. उद्या दुपारी शनिवारी दुपारी 3 वाजता इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्सच्या संचालिका डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांच्याहस्ते या सेंटरचे उदघाटन करण्यात येणार आहे. जीआयटी सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक्समध्ये खगोल संशोधनासाठी अत्याधुनिक दुर्बिणी व अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध केले आहे. विध्यार्थ्यांसाठी या क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्सेस तसेच प्रोजेक्ट्स सुरु करण्यात येणार असल्याचे राज बेळगावकर यांनी सांगितले.

संस्थेच्या विध्यार्थ्यांना क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यासाठी जीआयटीतर्फे अत्याधुनिक क्रीडासाहित्याने सुसज्ज स्पोर्ट्स इन्स्टिटयूट देखील सुरु करण्यात येणार असल्याचे सांगून राज बेळगावकर म्हणाले की, या स्पोर्ट्स इन्स्टिटयूटमध्ये जीआयटी तसेच केएलएस संस्थेच्या विविध विद्याशाखांतील विध्यार्थ्यांना विविध खेळांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल. जीआयटीने उद्योगांच्या आवश्यकतेनुसार नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रमांद्वारे अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात असल्याने आमच्या विध्यार्थ्यांना नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. प्लेसमेंट सेल, कॅम्पस इंटरव्ह्यू अशा माध्यमातून कोरोनाच्या मंदीच्या काळातही आमच्या विध्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजच्या प्लेसमेंट मिळाल्या आहेत. सध्या जीआयटीत “औरा-२३” राष्ट्रीय युवा कल्चरल कार्निव्हल सुरु असून त्याला देशभरातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचेही बेळगावकर यांनी सांगितले.यावेळी प्रा. चेतन कोटबागी, सतीश आदी उपस्थित होते.

Tags: