डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दर्जेदार पद्धतीने पुनर्विकास करून विध्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनी सांगितले.
बेळगावातील राणी चन्नम्मा चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या 1 कोटी 30 लाख रुपये निधीतून पुनर्विकास करण्याच्या प्रकल्पाची आ. अनिल बेनके यांच्याहस्ते कुदळ पूजन करून पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर बोलताना आ. बेनके म्हणाले, बेळगावची भूमी पवित्र आहे. स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर अशा प्रभूतींचा पदस्पर्श या भूमीला झाला आहे. डॉ. आंबेडकरांचे नाव दिलेले हे उद्यान अनेक विध्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठिकाण बनले आहे.
विध्यार्थी दशेत मीसुद्धा या ठिकाणी येत होतो. आता दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्याशी चर्चा करून या उद्यानात ई-लायब्ररी, सांस्कृतिक भवन, आयएएस, आयपीएस कोचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकल्पासाठी अत्यंत कमी वेळेत 1 कोटी 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे मंजुरीसाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यांचा मी आभारी आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्या पडल्या आहेत. जूनपासून विध्यार्थ्यांना येथे अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध व्हायला हवी. त्यामुळे लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने ही सर्व कामे करून देण्याच्या सूचना मी संबंधित अभियंत्यांना दिल्या आहेत असे आ. अनिल बेनके यांनी सांगितले.
प्रारंभी आ. अनिल बेनके यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून, कुदळ पूजन करून या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले, दुर्गेश मेत्री, मल्लेश कुरंगी आदी उपस्थित होते.


Recent Comments