Belagavi

२० मार्च रोजी राहुल गांधींची बेळगावात सभा : डीकेशी

Share

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा बेळगावात होणार आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनासाठी निवडलेल्या बेळगावच्या भूमीत ही सभा होणार आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने सीमाभागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार बरखास्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, येत्या २० मार्च रोजी राहुल गांधी बेळगावात युवा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर त्यांची ही पहिलीच सभा आहे. देश आणि राज्यातील युवकांच्या बेरोजगारीसारख्या कळीच्या मुद्द्यांवर या सभेत विचारमंथन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेस अधिवेशनासाठी निवडलेल्या बेळगावच्या भूमीत ही सभा होणार आहे असे ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी महात्मा फुले आरोग्य योजना लागू करूनही भाजप सरकार मूग गिळून गप्प आहे. हा कर्नाटकच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आपली जमीन, भाषा, सीमा याविषयी आम्ही तडजोड करणार नाही. विशेषत: बेळगावात सुवर्णसौध वास्तू बांधून झाली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप सत्तेत आहे, कर्नाटकातही भाजपचे सरकार आहे. भाजप सर्व कन्नडिगांची शांतता नष्ट करण्याचे काम करत आहे. काँग्रेस पक्ष एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील 800 हून अधिक गावांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही केवळ निवडणुकीची खेळी आहे.
मुख्यमंत्र्यांना एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही आमच्या राज्याच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे.

कर्नाटक राज्यात कोणीही येऊन राज्य करू शकतो. कलम 356 नुसार महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्यात यावे. इतर राज्ये आपल्या राज्यात ढवळाढवळ करत आहेत हे निंदनीय आहे. यावर केंद्र सरकारने नियंत्रण ठेवावे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी केली.

भाजप नेते मोहन निंबीकाई यांनी यापूर्वी भाजपमध्ये मोठ्या पदावर काम केले आहे. आता भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळून ते विनाअट काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षाची तत्वे स्वीकारून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत असे शिवकुमार यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना मोहन निंबिकाई यांनी, मी भाजप सोडून काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी गेली काही वर्षे भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. काँग्रेसने कोणतीही जबाबदारी दिली तर ती योग्य प्रकारे पार पाडेन असे त्यांनी सांगितले. यावेळी सिद्दरामय्यांसह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

Tags: