कर्जात अडकलेला पती कुटुंब सोडून गायब झाल्याने दिशा उरली नसल्याने महिलेने आपल्या तीन मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनीच बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन वेळीच उपचाराची व्यवस्था केली, त्यामुळे चारही जण वाचले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल जनता प्लॉट येथे राहणाऱ्या सरस्वती अदृश्यप्पा हंपन्नावर या 40 वर्षीय महिलेने आपल्या सृष्टी (14), साक्षी (8) आणि सान्वी (3) या 3 मुलींसह फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
अदृश्यप्पा हंपन्नावर हा अनेक वर्षांपासून बेळगावच्या अनगोळ येथील एका सलूनच्या दुकानात काम करत होता. पत्नी सरस्वती आणि आपल्या तीन मुलांसह अनगोळ येथे एका भाड्याच्या घरात तो राहात होता. मध्यंतरी अदृश्यप्पाने मोठे कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडू न शकल्याने अदृश्यप्पाने १५ दिवसांपूर्वी पत्नी आणि तीन मुलींना सोडले. त्यामुळे घासभर अन्नाला महाग झालेल्या सरस्वतीने आपल्या मुलांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी डीसी कार्यालय गाठले. त्यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महिलेची चौकशी केली. त्यावेळी तिथे असलेली मोठी मुलगी सृष्टी हिने दावा केला की तिच्या आईने त्या तिघांसाठी काही रस प्यायला होता. तोपर्यंत सरस्वती आणि तिन्ही मुलांना उलट्या होऊ लागल्या.
सतर्क झालेल्या डीसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने डीसी कार्यालयाजवळील पोलिसांची मदत घेत चौघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले.
सरस्वती आणि तिच्या तीन मुलींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन त्यांना काय मदत करते ते पाहावे लागेल. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बेळगाव मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments